प्रकरणी तूर्तास कारवाई नको- हायकोर्टाचे निर्देश
मुंबई, (प्रतिनिधी) – विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी आमदार मंगेश सांगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. सुटीकालीन न्यायालयाचे न्या. एम.एस. कर्णिक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी पर्यंत सांगळे यांच्या विरोधात कारवाई करू नये.असा आदेश पोलिसांना दिला.
ऐरोली सेक्टर- ए मधील यश पॅराडाइज इमारतीत राहणारे मंगेश सांगळे यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये 19 वर्षीय पीडित तरुणीला आपल्या घरी कामानिमित्त बोलावून घेतले. त्यावेळी सांगळे यांनी पीडित तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मंगेश सांगळे यांनी दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीला मेसेज पाठवून याबाबत कुणाकडे वाच्यता न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर या तरुणीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने माजी आमदार सांगळे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला त्या अर्जावर सुटीकालीन न्यायालयाचे न्या. एम.एस. कर्णिक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने अर्जाची सुनावणी मे महिन्याच्या सुटीनंतर नियमित न्यायालयासमोर जून महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आणि तोपर्यंत कारवाई करू नये असे आदेश पोलिसांना दिले.