प्रासंगिक – मातृदेवो भव 

वृषाली पंढरी 

मे महिन्यातला दुसरा रविवार हा जगभर पाळला जाणारा एक दिवस, म्हणजे “मातृदिन’.मातृदेवो भव म्हणणाऱ्या भारतातही मातृदिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी आईला भेटवस्तू, ग्रिटिंग असे काहीतरी दिले जाते, तिला आनंद वाटेल अशा अनेक गोष्टी केल्या जातात. भारताशिवाय इतर जगभरातील काही देशांमध्येही मातृदिन साजरा केला जातो.

मदर्स डे ग्राफटन वेस्ट वर्जिनियातील एना जॉर्विसने जगभरातल्या मातांसाठी आणि त्यांच्या मातृत्वासाठी सुरू केला. आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याच्या विचारातून हा दिवस साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून हा दिवस जगभरातल्या अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. असेही सांगितले जाते की, या दिवसाची सुरुवात ग्रीसमधून झाली. स्य्बेले ही ग्रीक देवतांची आई होती. तिच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

इंग्लंडमध्ये 17 व्या शतकात लेंट म्हणजेच 40 दिवसांच्या उपवासादरम्यान चौथ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जात असे. हल्ली असा उपवास कुणीही करत नाही. या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. त्यानंतर मुले आपल्या आईला फुले भेट देतात. युरोप आणि ब्रिटनमध्ये आईबद्दल प्रेम व्यक्त करण्याची विशेष परंपरा प्रचलित आहे. एका विशेष रविवारी आई आणि मातांचा विशेष सन्मान केला जातो. याला मदरिंग संडे असेही म्हटले जाते. अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे प्रोक्‍लॉमेशन जुलिया वॉर्ड होवे हिने साजरा केला होता. होवो ही स्त्रीवादी होती. तिने महिलांना आणि मातांना राजकीय स्तरावर आदर मिळावा यासाठी मातृदिन साजरा करण्याचे ठरवले.

चीनमध्ये मातृदिन विशेष प्रसिद्ध आहे. या दिवशी आईला गुलनारच्या फुलांची भेट देण्याची प्रथा आहे. 1997 मध्ये चीनमध्ये हा दिवस गरीब मातांसाठी साजरा करण्याचे ठरले. विशेषत: ज्या ग्रामीण भागात आणि पश्‍चिम चीनमध्ये राहतात अशांसाठी सुरुवातीला साजरा झाला.

आईबद्दल बोलण्यापूर्वी “आई’ हा शब्द किती व्यापक आहे, हे प्रथम सांगू इच्छिते. आपण मराठीत मातेला आई म्हणतो, तसेच मायही म्हणतो. या दोन शब्दांतच किती माया दडली आहे, इंग्रजी भाषेत आईला मदर म्हणतात, पण आपल्या “आई’ किंवा “माय’ या शब्दाची गोडी यात नाही. आईच्या प्रेमाला तोड नाही. आपण तर संतांना, देवालाही माउली म्हणतो. विठुमाउली! संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली कुणाला माहीत नाही? धर्मग्रंथालाही आपण आई म्हणतो. देशाला, नदीलाही माता म्हटले जाते. ही आपल्या संस्कृतीचीच शिकवण आहे. यातून आईचा महिमाच दिसून येतो. साने गुरुजींनी “श्‍यामची आई; हे पुस्तक लिहुन आईची थोरवी अजरामर केली आहे. ही श्‍यामची आई पुस्तकरूपाने महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतातल्या सर्व मुलांची आई झाली आहे. पायाच्या तळव्यांना चिखल लागू नये म्हणून उड्या मारणाऱ्या श्‍यामला साने गुरुजींच्या पुस्तकातली आई म्हणते,

“श्‍याम, तळव्यांना घाण लागू नये म्हणून जितका जपतोस, तितकाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!.” केवढा मोठा उपदेश, संस्कार या एका वाक्‍यात दडला आहे!! ‘आई’ या दोन शब्दांत जे प्रेम, वात्सल्य, माया, ममता, करुणा साठवलेली आहे, ती इतर कोणत्याच शब्दात नसेल. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्‍वर! जणू आई म्हणजे ईश्‍वराचंच दुसरं रूप. असं म्हणतात, ‘ ईश्‍वराला प्रत्येक ठिकाणी जाणं जमलं नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.आपला प्रतिनिधी त्याने आईच्या रूपाने घरोघरी पाठवला.’ बाळाच्या मनातील आईची थोरवी सांगणारे हे छोटेसे काव्य.

नीज न ये तर गीत म्हणावे 
अथवा झोके देत बसावे 
कोण करी हे जीवेभावे 
ती तर माझी आई. वात्सल्यसिंधू आई!! 

सर्वा बाबत आईचा हा अनुभव एकसारखा असतो. मी तरी त्याला अपवाद कशी बरे असेन? माझ्या बाबतीत आईनेच काबाडकष्ट करून मला घडवलं. मला कसलीही उणीव भासू दिली नाही. माझी आईच तर माझे सर्वस्व आहे. मी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक व्हावी यासाठी ती जे कष्ट घेत असे, ते पाहून माझे अंत:करणही उचंबळून येत असे. सलग चार वर्षे शाळेत माझी आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झाली, तेव्हा प्रत्येक वेळी मला आठवण झाली ती माझ्या आईचीच. मुख्याध्यापकांनी माझ्या ज्या-ज्या गुणांचा गौरव केला, त्या-त्या गुणांचे सारे श्रेय माझ्या आईलाच जाते. म्हणून तर आमच्या शाळेनेसुद्धा गुणवंत पालक म्हणून एकदा माझ्या आईचादेखील सत्कार केला होता. मला सुसंस्कृत बनविण्यासाठी नेहमीच तिची धडपड असायची. ती काही उच्चविद्याविभूषित वगैरे नव्हती, इतर चारचौघींसाखीच होती.

आम्ही चाळीत राहायचो.मला चांगल्या सवयी लागाव्या, माझी सर्वागीण वाढ व्हावी, म्हणून ती नेहमीच दक्ष असायची. अभ्यासाबरोबरच खूप अवांतर वाचन करावे, याबाबत तिचा कटाक्ष असायचा. थोरा-मोठयांची चरित्रे वाचावी याबद्दल ती आग्रही असे. माझ्यावर चांगले संस्कार व्हावेत, हाच त्यामागचा तिचा हेतू असायचा. मात्र शिस्तीच्या बाबतीत ती खूप कडक होती. इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत चार वर्गातून दरवर्षी मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. घरखर्च सांभाळण्यासाठी शिकवण्या घेणे हे तिचे नेहमीचेच काम. तिला कधीच उसंत मिळत नसे. तरीही त्यातून वेळ काढून ती सगळ्यांसाठी अपार कष्ट करीत असे. तिचे ‘सुरेखा’ हे नावही मला तिच्या सुरेख स्वभावासारखेच वाटते. ती माझ्यावर कितीही रागावली, बोलली, तरी तिचा तो प्रेमाचा हक्क आहे, कारण ती माझी आई आहे, याचा मला कधीही विसर पडत नसायचा. “प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई’ याचा प्रत्यय मला नेहेमी यायचा. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाहीच मुळी.

जिजाऊंमुळे शिवछत्रपती घडले, बहिणाबाई चौधरींमुळे सोपानदेव चौधरी घडले, माझ्या आईमुळे मी घडले अशी अगणित उदाहरणे पाहिली की आईची थोरवी लक्षात येते. आकाशाची उंची कमी पडावी एवढी उत्तुंग असते आई. बुद्ध, गांधीजी, राम-कृष्ण, शिवाजी असो, की न्यूटन,आईन्स्टाइन! सारे तिच्याच पोटी जन्म घेतात. संत असो, राजा असो वा रंक, सगळे पृथ्वीतलावर अवतरतात आईच्या उदरातूनच. मोठ्या वृक्षांच्या छायेत रोपे सुकतात, कोमेजतात. पण आईची सावली वेगळीच. ज्यांच्या दीर्घकाळ वाट्याला ही सावली येते, ते खरे भाग्यवान.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)