माळीणच्या धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा! – शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मृतांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. लोकांची घरे, पीकं आणि शेतजमीनीही वाहून गेल्या आहेत. राज्य सरकारने पीडितांना दिलेली मदतही तुटपुंजी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुनर्वसनाशिवाय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा आग्रहही त्यांनी धरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण 2 जुलै रोजी फुटून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 20 जण मरण पावले असून तीन व्यक्ती अजून बेपत्ता आहेत. 8 जुलै रोजी शरद पवार यांनी तिवरे धरणफुटी प्रकरणाचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेतला होता. त्याचबरोबर पीडितांशी संवादही साधला. यावेळी पीडितांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. त्यावेळी पवारांनी दुर्घटनाग्रस्तांना सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापार्श्वभूमिवर धरणदुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करुन त्यांना सार्वजनीक मुलभूत सुविधा वेगाने पुर्नस्थापित करुन द्याव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेवेळी मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी आणि इतर मार्गाने बाधित कुटुंबापर्यंत मदत पोहचवून सरकारच्या प्रचलित योजना प्रधान्यक्रमाने राबवल्या गेल्या. याच धर्तीवर तिवरे गावातील ग्रामस्थ आणि बाधितांच्या मागण्यांचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत म्हणून 4 लाख रूपये सानुग्रह अनुदान दिले. ही मदत नैसर्गिक आपत्तीवेळी स्थायी आदेशाद्वारे दिले जाणारे अनुदान आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतूनही अनुदान वितरीत व्हावे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय करावी. कमावत्या पीडित वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, असा आग्रहही पवार यांनी धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)