पार्किंगमध्ये तळीरामांचा अड्डा
फळकुटदादांची भरतेय शाळाप्रेमीयुगुलांच्या गैरकृत्यांमुळे टेरेसला टाळे
व्यापारी संकुलाच्या टेरेसवर येण्या जाण्यासाठी यापूर्वी मज्जाव नव्हता. त्यामुळे प्रेमी युगुलांसाठी व्यापारी संकुलाचे टेरेस हा लव्हर्स पॉईंट बनला होता. याठिकाणी प्रेमी जोडप्यांचे अश्लील चाळे सुरू असायचे. याला आळा घालण्यासाठी गाळेधारकांनी टेरेसवर ये-जा करण्यासाठी असलेल्या जिन्याला टाळे ठोकले आहे.
ठोसेघर – सातारा शहराच्या मध्यवर्तीय ठिकाणी असलेल्या राजवाडा बसस्थानका समोरील नगरपालिकेचे विकासरत्न श्री. छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाला गेल्या काही दिवसांपासून समस्यांचा विळखा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. व्यापारी संकुलाच्या वाहनतळ हा तळीरामांचा अड्डा बनला असून फाळकुट दादांची शाळा या वाहन तळात भरत आहे.
राजवाडा परिसरात असलेल्या नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाचे वाहनतळ गेल्या काही दिवसांपासून तळीरामांचा ओपन बार त्याचबरोबर फाळकुट दादा आणि त्यांच्या फुटकळ सर्मथकांचा अड्डा बनला आहे. सकाळ पासूनच मद्यपी वाहनतळात बाटल्या घेऊन तळ ठोकून असतात. अंधार पडल्यावर तर याठिकाणी दारू पिण्यासाठी तळीरामांची मोठी गर्दी पहायला मिळते. शेजारीच असलेल्या वाईन शॉपमधुन बाटल्या घेऊन या ठिकाणी ओपन बार भरवतात. तर आसपासच्या परिसरातील काही भुरटे दादा आणि त्यांचे चेले याठिकाणी ठाण मांडून असतात.
यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग असतो. तर समोर असलेल्या राजवाडा बसस्थानकांवर मजनुगिरी करणाऱ्यासाठी आलेल्या रोड रोमिओंचाही या वाहन तळात कायम वावर असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी बिनधास्तपणे सिगारेटचे दम मारताना याठिकाणी आढळून येतात. तर मावा, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याने येथील भिंतीवर विचित्र रंगकाम केले असल्याचे चित्र दिसते. तळीरामांनी दारू पिऊन फेकलेल्या दारूच्या बाटल्यांचा, ग्लास, पाण्याचा बाटल्या यांचा अक्षरशः खच याठिकाणी पडला आहे. त्यामुळे या वाहन तळाला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, याठिकाणी राजरोस बिनधास्तपणे सुरू असलेल्या या सर्व गैर प्रकारांमुळे व्यापारी संकुलातील गाळेधारक व्यापारी त्रस्त झाले आहेत. वाहन तळांत वाहने पार्क करणे देखील मुश्कील झाले आहे. या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरीला गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने याठिकाणी वेळोवेळी छापे मारून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संकुलातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांमधून होत आहे.