घर, वाहनावरील व्याजदरात होणार कपात ; आरबीआयने घेतला नागरिकांना दिलासा देणारा निर्णय

शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या मर्यादेत 60 हजार रुपयांनी वाढ ; कर्जावरील हप्त्याची रक्कम कमी होणार

मुंबई: केंद्राच्या अंतरिम बजेटनंतर आता रिझर्व्ह बॅंकेने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले असून त्यानुसार, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरात 0.25 टक्‍क्‍यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत. आता इतर बॅंका पुढील आठवड्यापासून त्यांच्या विविध कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर करण्याची शक्‍यता आहे. तसा आग्रह उद्योजकांच्या संघटनांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये तीन हप्त्यांत देण्याचे जाहीर केले आहे. त्यातील काही रक्कम चालू किंवा पुढच्या महिन्यात मिळणार आहे. त्याचबरोबर सरकारने प्राप्तीकर उत्पन्न मर्यादा 2.5 लाखावरुन 5 लाख रुपये केली आहे. त्यामुळे मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढणार असतानाच व्याजदरातही तब्बल पाव टक्‍क्‍याची कपात झाल्यामुळे घर, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन इत्यादींच्या विक्रीला चालना मिळून अर्थव्यवस्था विस्तारण्याची शक्‍यता आहे.

नोटबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्याची अंमलबजावणी आणि भांडवल असुलभतेमुळे गेल्या तीन वर्षांपासून घर बांधणी आणि विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. तयार घरासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काही करसवलती जाहीर केल्यानंतर आता व्याजदरातही कपात केली असल्यामुळे नव्या घराच्या निर्मितीला त्याचबरोबर विक्रीला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर जुन्या कर्जावरील परतफेडीचा हप्ताही कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे क्षेत्र पुनरुज्जीवित होणार आहे.

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरातील कपातीबरोबरच भांडवल सुलभता निर्माण करणार असल्याच सांगितले. त्याचबरोबर या महिन्यात बिगर बॅंकिग वित्त संस्थांच्या वर्गवारीचे दिशादर्शक नियम जाहीर करणार असल्याचे सांगितले.

28 जानेवारी रोजी सरकारी बॅंकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दर कमी करण्याचे संकेत दिले होते. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बॅंकेचा हप्ताही कमी होणार आहे.

दरम्यान, यंदाच्या 2019-20च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा 7.4 राहण्याची शक्‍यता आरबीआयने वर्तवली आहे. त्याचबरोबर महागाईचा दर 3.2 टक्के राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या सहामाहित हा दर ते 3.4 आणि तिमाहित 3.9 टक्के दर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी तारणविरहीत कर्जाच्या मर्यादेत वाढ

तसेच शेतकऱ्यांसाठीही रिझर्व्ह बॅंकेने मोठा निर्णय घेतला असून त्यांच्यासाठी तारणविरहीत कर्जाच्या रकमेत सुमारे 60 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या कर्जाची मर्यादा 1 लाख 60 हजार रुपये झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे. गव्हर्नरपदी विराजमान झाल्यानंतर शक्तीकांत दास यांची पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)