इस्लमाबाद – पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजुक बनली असल्याने सरकारने काटकसरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याला स्वताहून प्रतिसाद देण्याचे पाकिस्तानी लष्कराने ठरवले असून त्यांनी संरक्षणावरील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कराचे प्रमुख अधिकारी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही माहिती दिली आहे. ते लष्कराच्या माध्यम विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्षातील खर्चात लष्कर मोठ्या प्रमाणात कपात करणार आहे. मात्र ही कपात करताना देशाची सुरक्षा आणि संरक्षणावर त्याचा विपरित परिणाम होणार नाहीं याचीही काळजी घेतली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या खर्चात कपात केली जात असल्याने तेच सूत्र लष्करी खर्चाच्या बाबतीतही राबवले जाईल. ही काटकसर कशा प्रकारे केली जाईल याचा तपशील लष्करी विभागांकडून ठरवला जाणार आहे. पाकिस्तानी लष्कराने स्वताहून हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान इम्रानखान यांनी त्यांचे कौतुक केले आहे. लष्करापुढे अनेकविध आव्हाने असताना त्यांनी असा निर्णय घेण्याला खूप महत्व आहे असे त्यांनी म्हटले आहे.