मतमोजणीसाठी 862 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

84 टेबलवर होणार मतमोजणी : प्रशासनाची तयारी सुरू
नगर – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे 84 टेबल ठेवण्यात येणार असून, या 168 टेबलांवर 22 लाख 13 हजार 982 मतांची मोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी 862 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना द्वितीय प्रशिक्षण 19 मे रोजी दिले जाणार आहे.

नगर मतदारसंघाची 23 एप्रिल रोजी, तर शिर्डी मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान झाले. नगर मतदारसंघातील 2 हजार 30 मतदान केंद्रांवर 11 लाख 91 हजार 521, तर शिर्डी मतदारसंघातील 1 हजार 710 मतदान केंद्रांवर 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यानुसार नगर मतदारसंघातील मतमोजणी नगर एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या दक्षिणेकडील गोदाम क्रमांक 1 येथे, तर शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्रमांक 3 येथे होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी प्रत्येकी 6 कक्ष राहणार आहेत. लष्करी मतपत्रिका नगर मतदारसंघात 13 हजार 178, तर शिर्डी मतदारसंघात 8 हजार 870 पोस्टल मतपत्रिका असून, आतापर्यंत नगरसाठी 4 हजार 979 तर शिर्डीसाठी 4 हजार 766 मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. लष्करी जवानांसाठी नगर मतदारसंघातून 7 हजार 148, तर शिर्डी मतदारसंघातून 2 हजार 776 मतपत्रिका पाठविल्या होत्या.

या टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. मतमोजणीसाठी एका मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल ठेवले जाणार आहेत. मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे नगर मतदारसंघातील मतमोजणी 84 टेबलांवर होणार आहे. शिर्डी मतदारसंघात देखील 84 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी एकाच ठिकाणी मात्र वेगवेगळ्या गोदामांत होणार आहे. यासाठी मात्र कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

या दोन्ही गोदामांभोवती थ्री टीयर सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे. प्रत्येक गोदामाभोवती पहिल्यांदा केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे 26, त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाचे 26 व शेवटी जिल्हा पोलीस दलाचे 19 अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी मात्र एकच टेबल असणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अतिरिक्‍त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्‍त केले आहेत. पोस्टल बॅलेटसाठी प्रत्येकी एका मतदारसंघात एक उपजिल्हाधिकारी असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)