“वायू प्रदूषणावर मात’ अभियानातंर्गत कारवाई ः अस्वच्छता करणाऱ्यांकडूनही दंड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे “वायू प्रदूषणावर मात’ या अभियानांतर्गत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध भागात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. एका दिवसात तब्बल 1 लाख 5 हजारांच्या दंड वसूल करण्यात आला. तसेच, अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना एकूण 26 हजार 180 रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे ही मोहिम राबविण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्येकर्ते आणि स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.
या वेळी महापालिकेच्यावतीने कचरा न जाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्लॅस्टिक बंदीअंतर्गत शहरातील एकूण 220 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 19 दुकानदारांकडून 1 लाख 5 हजारांच्या दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये, एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील सराफी दुकान, थेरगाव येथील एका दुकानदाराकडे दुसऱ्या वेळेस प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजारांच्या दंड करण्यात आला. तसेच, प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे आणि कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून 26 हजार 180 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत महापालिकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, सहायक आरोग्यधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.