78 हजाराचा दंड वसुल; 250 दुचाकीस्वारांना “ब्रेक’

प्रशांत जाधव

सातारा – मुली व महिलांची छेडछाड करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी कार्यरत असलेल्या सातारा शहरातील निर्भया पथकाने गेल्या पाच महिन्यांत दिड हजार टवाळखोरांना पोलिसी दणका दिला आहे.यामध्ये 283 हून अधिक सडकसख्याहरी दुचाकीचालक आहेत. फक्त कारवाईच न करता पोसिलांनी कारवाई केलेल्यांना समुपदेशन करून पालकांकडे स्वाधीन केले. एकूण 1497 तरूणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून 56 हजारांचा दंड वसूल केला आहे.पोलिसांनी धडक कारवाई केल्याने सडकसख्याहरींनी महाविद्यालय परिसरात न फिरणेच पसंत केले आहे.
गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या भागात युवती व महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत काही युवतींनी पोलिस ठाण्यांत तक्रार केली होती, तर काही शहरांमध्ये छेडछाड असह्य झाल्याने मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्याच पार्श्‍वभूमीवर शालेय, कॉलेजवयीन आणि विवाहित महिलांची छेडछाड करण्यासाठी शहरातील गजबजणारे चौक, बसस्टॉप, मार्केट परिसर, शैक्षणिक खासगी क्‍लास असे परिसर टवाळखोर मुलांचे अड्डे पोलिसांच्या निशाण्यावर होते. तसेच अश्‍लील मेसेज पाठवणे, कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास देण्याचे प्रकारही सुरू होते. छेडछाडीविरोधात प्रत्यक्ष तक्रार करणाऱ्या मुलींची संख्या कमी आहे. छेडछाडीचा त्रास होत असेल तर शाळा-कॉलेजला पाठवणे बंद होईल या भीतीने मुली पालकांना सांगत नाहीत, तर वैवाहिक नात्यात गैरसमज होईल म्हणून विवाहित महिलाही याकडे दुर्लक्ष करतात.यामुळे मुली व महिलांची घुसमट होते.अशा नाजुक प्रकरणात निर्भया पथकाने मोठ्या कौशल्याने टवाळखोरांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.

सातारा शहरातील निर्भया पथकाने नोव्हेंबर 2018 मध्ये 272 टवाळखोरांना तर दुचाकीवरून नियम मोडून फिरणाऱ्या 75 जणांना, डिसेंबर 2018 मध्ये 649 टवाळखोरांना तर दुचाकीवरून नियम मोडून फिरणाऱ्या 130 जणांना, जानेवारी 2019 मध्ये 558 टवाळखोरांना तर दुचाकीवरून नियम मोडून फिरणाऱ्या 88 जणांना धडा शिकवला आहे. या कारवाई दरम्यान टवाळखोरी करणाऱ्या 1479 जणांकडून 56 हजाराचा तर दुचाकीवरून नियम मोडणाऱ्या 283 जणांकडून 22 हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 11 जणांकडून दोन हजार दोनशे रुपयांचा दंड निर्भया पथकाने वसूल केला आहे. केवळ दंडात्मक कारवाई न करता महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांच्यासह त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांनी कारवाई केलेल्या तरूणांचे समुपदेशन करून गुणात्मक कामही करून दाखवले आहे.

… एलबीएस, कला वाणिज्यकडेही लक्ष द्या

निर्भया पथकाच्या भितीने वायसी परिसरात शांतता निर्माण झाली असली तरी ही शांतता शहरातील एलबीएस, कला वाणिज्य, अनंत न्यू इंग्लीश स्कूल या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींच्या वाट्याला कधी येणार हा प्रश्‍न आहे.

सातारा, फलटण, कराड वगळता मरगळ

मुलींच्या सुरक्षेसाठी सन 2017 साली राज्यमंत्री मंडळाच्या आदेशानुसार राज्यभर निर्भया पथकाची स्थापना झाली. त्यानंतर साताऱ्यातही या पथकाचे काम सुरू झाले. सातारा,कराड,फलटण या शहरात निर्भया पथकांचे काम जोरात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील इतर भागात या पथकांचा साधा ठावठिकाणाही नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्याच्या इतर पोलिस ठाण्यांच्या कागदोपत्री असणारी निर्भया पथके प्रत्यक्षात काम करतील तेव्हाच खरे.

वडूज, दहीवडीत बोलाची कडी अन्‌ बोलाचा भात

वडूज शहरात दोन मोठी विद्यालये, महाविद्यालये तसेच एक अभियांत्रीकी महाविद्यालय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना रस्त्याने येता-जाता, बसस्थानक परिसरात टवाळखोरांचा त्रास होताना दिसतो आहे. मात्र निर्भया पथक अशावेळी नेमके कुठे असते असा सवाल विचारला जात आहे. गेल्या महिन्यात चार दोन कारवाया करून गायब झालेले वडूजचे निर्भया पथक म्हणजे बोलाचा कडी अन्‌ बोलाचा भात असल्याचेच बोलले जात आहे. दहीवडी पोलिस ठाण्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी नसल्याचे वास्तव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)