तब्बल 17 वर्षांनंतर नोंदवली साक्ष

– बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरण

पुणे – बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात साक्षीदार असलेल्याच्या तब्बल 17 वर्षांनंतर साक्ष नोंदवण्यात आली. विशेष मोक्‍का न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर शनिवारी शेख सिराजऊल रहेमान (वय 48, रा. अहमदपूर, लातूर) यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 18 मे 2003 रोजी नोंदविलेल्या जबाबाची सरकार पक्षाने साक्ष घेतली.
शेख म्हणाले, “मी 1996 मध्ये मुंबईत आलो. त्यावेळी मी तत्कालिन आमदार भगवान नागरगोजे यांच्या कुलाबा येथील आमदार निवासमध्ये राहायला होतो. त्यावेळी माझी अब्दुल करीम तेलगीसोबत ओळख झाली.

तेलगी म्हणाला, “माझे मंत्रालयात स्टॅम्प व्हेन्डिंगचे लायसेन्स काढण्याचे काम आहे’ त्यावेळी माझे करून देण्याची मागणी केली होती. माझ्या ओळखीचे पत्रकार हरिश पाठक यांना मी लायसेन्स मिळण्याबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी लायसन्स मिळेल, पण त्यासाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च येऊ शकतो,’ असे सांगितले. तेलगीने 20 हजार रुपये दिले आणि तत्कालिन मुद्रांक अधीक्षक राधेश्‍याम मोपेलवार यांच्याकडे अर्ज दाखल करण्यास सांगितले.

कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पाठक यांनी तत्कालिन कायदामंत्री लिलाधर डाके यांच्याकडे नेले. मात्र, संबंधित खाते नारायण राणे यांच्याकडे होते. त्यामुळे मी, पाठक आणि ज्यांना लायसन्स पाहिजे होते, ते एम. डी. जाधव राणेंना भेटलो. राणेंनी त्यांचे पीए शेडगे यांना आमचे काम करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर लायसन्स मिळाले होते. दरम्यान, तेलगीचा पुतण्या तबरेज याला मुंबईत अटक झाली. त्यामुळे माधव यांचे लायसन्स सरेंडर करावे लागले होते. त्यानंतर सरकार बदलले. त्यावेळी तेलगी मला म्हणाला की, “तुझ्या गावचे मुख्यमंत्री झालेत. पुन्हा लायसेन्स काढून तुला देतो.

माझा मित्र नरेश राठोड माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्याकडे घेऊन गेला. त्यावेळी अशोक चव्हाण हे राज्याचे महसूल मंत्री होते. चव्हाण यांचे पीए राजेश जिवाणी यांच्याकडून परवाण्याचे काम करून घेतले. मी ज्यावेळीस तेलगीला त्यांच्या कार्यालयात भेटायचो तेव्हा आमदार अनिल गोटे, अनिल शहा, शर्मा, सावंत आदी तेथे असायचे.’ आरोपींच्यावतीने ऍड. विद्याधर खोसे, ऍड. मिलिंद पवार, ऍड. श्रुषी घोरपडे आणि ऍड. श्रेयेस कुलकर्णी यांनी साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जूनला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)