राजकारणातील तत्त्वांची जपणूक

– द. वा. आंबुलकर

आटपाट नगर होतं. त्या नगरात एक मतदारसंघ होता. त्या मतदारसंघात एकदा निवडणूक झाली व निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने ती निवडणूक अवघे 4000 रु. खर्चून केवळ लढविलीच नव्हे, तर जिंकलीसुद्धा!

पुराणांतर्गत आढळून येणाऱ्या भाकडकथांपैकी एक भासणऱ्या या राजकीय कथेचे जनक आहेत- भीष्मनारायण सिंह! होय, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात सांसदीय कामकाजमंत्री व त्यानंतर तब्बल 7 राज्यांचे राज्यपाल म्हणून काम करणारे कॉंग्रेसी नेते भीष्मनारायण सिंह यांनी त्याच्या सार्वजनिक- राजकीय जीवनातील पहिली निवडणूक सुमारे 45 वर्षांपूर्वी केवळ 4000 रु. खर्चून फक्त 3 जीपगाड्यांच्या मदतीने व यशस्वीपणे लढविली होती ही आज एक आश्‍चर्यकारक वाटणारी वस्तुस्थिती आहे.

स्वतःला मोठ्या अभिमानाने (महात्मा) गांधीवादी म्हणवून घेणारे वयोवृद्ध भीष्मनारायणसिंह नमूद करायचे की, सुमारे 70 च्या दशकापर्यंत देशाच्या राष्ट्रीय राजकारणावर म. गांधीजींच्या विचारदर्शनाचा प्रभाव होता. त्यावेळी प्रत्येक राजकीय पक्षात पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा व साधेपणा, प्रामाणिकपणा याला सर्वाधिक महत्त्व देण्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीटवाटप पण याच आधारे केले जात असे. परिणामी प्रत्येकजण तत्त्वांची जपणूक करीत असे.

डॉ. भीष्मनारायणसिंह यांच्यापुढे त्यावेळी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, डॉ. राजेंद्र प्रसाद, लोकनायक जयप्रकाश नारायण आदी आदर्श म्हणून होते. त्यांच्या आठवणीनुसार कृष्णाबाबूंनी केलेल्या आग्रहापोटी 1967 मध्ये त्यांनी तत्कालीन बिहारच्या पलाम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. त्यांच्या शेकडो (हजारो नव्हे) कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने व निरपेक्षपणे त्यांचा प्रचार केला. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या राष्ट्रपती भवनातील राहणीमानाबद्दल बोलताना भीष्मनारायणसिंह नमूद करायचे की, राजेंद्रबाबू आजीवन स्वतः कातलेल्या कापसाच्या धाग्याच वस्त्र वापरायचे. राष्ट्रपती झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या राहणीमानात कसलाही फरक पडला नाही. प्रसंगी प्रवास आणि कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे राजेंद्रबाबूंना सूत कातायला वेळ मिळाला नाही व परिणामी त्यांना कधी फाटकी चादर वापरावी लागली होती, भीष्मनारायणसिंह यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही व त्यांनी राष्ट्रपती भवनातील सहकाऱ्यांकरवी राजेंद्रबाबूंनी खादी ग्रामोद्योगमधून नवीन चादर आणावी असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर राजेंद्रबाबूंनी भीष्णनारायणसिंह यांना दिलेले उत्तर म्हणजे मी खादीची नवी चादर सहज आणू शकतो. मात्र, राष्ट्रपती म्हणून मला ही बाब कशी विसरून चालेल की आज देशात अनेकांच्या नशिबी फाटकी चादरसुद्धा नाही.

परिणामी, सलग दोन वेळा भारताचे राष्ट्रपती राहिलेले डॉ. राजेंद्र प्रसाद निवृत्तीनंतर पाटण्याला गेले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ 2500 रुपये होते. पंजाब नॅशनल बॅंकेने ही राशी आजही महत्त्वाची ठेव म्हणून कायम राखली असून त्यावेळचे सार्वजनिक राजकीय जीवन पैशाच्या प्रभावापासून कशाप्रकारे मुक्त होते याचे प्रत्यंतर पण त्याद्वारे येते.
त्यावेळी राजकीय-सार्वजनिक जीवन पैशाच्या प्रभावापासून कशाप्रकारे मुक्त होते याचे हे एक प्रमुख उदाहरण म्हणावे लागेल. याशिवाय त्याकाळी राजकीय- सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्‍वभूमी असणाऱ्या कुणाहीबरोबर वावरण्यास धजावत नसे. मात्र, निवडणुकीसह राजकारणावर धनदांडग्यांचा प्रभाव जसजसा वाढू लागला तसे सारे चत्रपट बदलत गेले. गुन्हेगार राजरोसपणे राजकारण करू लागले तर राजकारण्यांना गुहे आणि गुन्हेगारांचे सोयर-सुतक केव्हाच संपले. या साऱ्याचा परिाम आपण सद्यस्थितीत पाहतोच आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)