बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट

शेतकऱ्यांनी बियाण्यांचे पॅकेट सीलबंद असल्याची खात्री करावी : कृषी विभागाचे आवाहन

मंचर – शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बाजारातून बियाणे खरेदी करीत असताना योग्य ती पारख करायला हवी, अन्यथा फसगत होऊ शकते. त्यासाठी बियाणे खरेदीचे पक्‍के बिल तसेच बियाण्यांचे पॅकेट सिलबंद व मोहरबंद असल्याची खात्री करावी. हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. बोगस कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे या कंपन्यांनी कोणतेही आश्‍वासन दिले तरी शेतकऱ्यांनी त्याला बळी पडू नये.

कृषी विभागाने आवाहन केले आहे की, खासगी बियाणे कंपन्या दुकानदाराला मोठ्या प्रमाणात नफा देत असल्यामुळे बऱ्याचवेळा विक्रेते छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीत बियाणे उपलब्ध करून देतात. मात्र, बिल ओरिजनल न देता डुप्लिकेट देतात. या बिलाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेतात व मूळ बिलावर मात्र कमी किंमत लिहितात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. त्याचबरोबर बियाणे उगवले नाही, यासारखी समस्या निर्माण झाल्यास पक्‍के बिलच आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांनी दुकानदाराला पक्‍के बिलच मागावे. तसेच बियाणांची पिशवी सांभाळा. बियाणे खरेदी केल्यानंतर बियाणांची पिशवी, मूठभर बियाणे आणि पावती सांभाळून ठेवावी. कारण कंपनीने सांगितल्याप्रमाणे जर बियाणे उगवले नाहीत. तर अशा वेळी पक्‍के बिल आणि बियाणांची पिशवी आवश्‍यक ठरते. यामुळे ते कंपनीकडे झालेल्या नुकसानीचा दावा करू शकतात.

शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर
खत आणि बियाणे वाटपात अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोणतीही तक्रार असल्यास 18002334000 या क्रमांकावर संपर्क साधून शेतकऱ्यांना आपली तक्रार नोंदवता येणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावीत. बियाणांची खरेदी करताना पक्‍की पावती घ्यावी. बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पॉकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावेत. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पाकीट सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी. बोगस बियाणांविषयी काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

– संजय विश्‍वासराव, कृषी अधिकारी, आंबेगाव तालुका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)