अकरावीच्या 53 जादा तुकड्यांना मान्यता

पुणे – राज्यातील 33 कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या विविध शाखांच्या 53 जादा तुकड्यांना शासनाने मान्यता दिली असून या महाविद्यालयांना शासनाच्या निकषांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. विविध ठिकाणच्या जिल्ह्यातील वाढत्या विद्यार्थी संख्येच्या गरजेनुसार नवीन महाविद्यालये, जादा तुकड्यांसाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यात येत असते. 24 सप्टेंबर 2018 ते 6 मार्च 2019 या कालावधीत शासनाकडून निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत. यात प्रामुख्याने महाविद्यालयातील जादा तुकड्यांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. वाणिज्य शाखेसाठी 20, विज्ञान शाखेसाठी 30, कला शाखेसाठी 3 याप्रमाणे जादा तुकड्या सुरु करण्यातील मार्ग मोकळा झालेला आहे.

शासनाकडून जादा तुकड्यांना मान्यता दिल्यानंतर आता या महाविद्यालयांची विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी बजाविले आहेत. महाविद्यालयात भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येणार आहे. जादा तुकड्यांमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्‍यक पटसंख्या आहे का याची तपासणीही करण्यात येणार आहे. मंजूर करण्यात आलेल्या जादा तुकड्यांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही. वेळोवेळी शासनाच्या निकषांची पूर्तता करण्याच्या अटीवरच या तुकड्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. महाविद्यालयांना योग्य त्या सूचना देण्याची बजाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालकांवरच सोपविण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)