धर्मनगरींमधील वास्तव

भारतीय जनता पक्षाने 1990 पासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. लालकृष्ण आडवाणी यांनी यासाठी रथयात्राही काढली. याच मुद्द्याचा आधार घेत देशभरात भाजपाने हिंदुत्वाची लाट तयार केली आणि केंद्रातील सत्तेचा सोपानही चढला. यानंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपाकडून हा प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकांत मोदींनी विकास आणि विकास यावरच भर देत मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी राम मंदिराचा मुद्दा हा अंडरकरंट होताच. आताही लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिलेले असताना हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्यात आला. अनेकांच्या मते राम मंदिराचा मुद्दा हा भाजपासाठी ब्रह्मास्त्र आहे. पण यासंदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, अयोध्या, मथुरा आणि काशी म्हणजेच वाराणसी येथील मतदारांनी गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत कधीच एका पक्षाला साथ दिलेली नाही.

अयोध्या (फैजाबाद) : अयोध्येचे उदाहरण घेतले तर फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये भाजपाचे लल्लू सिंह 58.2 टक्‍के मते मिळवून विजयी झाले आहेत. तेथे दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पक्षाचा उमेदवार राहिला. त्याला 15 टक्‍के मते मिळाली. 2009 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे निर्मल खत्री हे 28.2 टक्‍के मते मिळवून विजयी झाले. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा उमेदवार 21 टक्‍के मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिला. 2004 च्या लोकसभा निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचे मित्रसेन यादव यांनी 30.2 टक्‍के मते घेत विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाचे लल्लू सिंह 25.3 टक्‍के मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

काशी (वाराणसी) : 2014 मध्ये नरेंद्र मोदी स्वतः या लोकसभा मतदासंघातून उभे राहिले आणि 56.37 टक्‍के मते घेत विजयी झाले. त्यावेळी ही लढत चुरशीची बनवण्यात आली होती. पण मोदींविरोधात उभे राहिलेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांना 20.30 टक्‍के मतेच मिळाली. 2009 मध्ये या मतदारसंघातून मुरली मनोहर जोशी 30.5 टक्‍के मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी बसपाचे उमेदवार 27.9 टक्‍के मते मिळवत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. 2004 मध्ये कॉंग्रेसच्या राजेश मिश्रा यांनी 32.6 टक्‍के मते मिळवत या जागेवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाचा उमेदवार 23.6 टक्‍के मिळवत दुसऱ्या स्थानावर राहिला होता.

मथुरा : 2014 मध्ये भाजपाच्या स्टार प्रचारक आणि सुप्रसिद्ध बॉलीवूूड अभिनेत्री हेमा मलिनी यांनी मथुरेतून 35.29 टक्‍के मते मिळवत विजय नोंदवला होता. रालोदच्या जयंत चौधरी यांना त्या निवडणुकीत 22.62 टक्‍के मते मिळाली होती. 2009 मध्ये मात्र जयंत चौधरी 52.29 टक्‍के मते मिळवत विजयी झाले होते. त्यावेळी 28.94 टक्‍के मते मिळवत बसपाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले होते. 2004 मध्ये कॉंग्रेसच्या मानवेंद्र सिंह यांनी 31.1 टक्‍के मिळवत या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपा उमेदवाराला 24.8 टक्‍के मते मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)