साहित्याचे निर्मळ प्रतिबिंब बिनविरोध निवडीमुळे वाचकांना पाहता येईल

बिनविरोध निवडीनंतर डॉ.अरुणा ढेरे यांचा वाई विश्वकोशशातर्फे सत्कार  

वाई : साहित्य प्रवाहातील बदलाची मी केवळ निमित्त असून साहित्याचे निर्मळ प्रतिबिंब बिनविरोध निवडीमुळे वाचकांना पाहता येईल, असे प्रतिपादन नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठी भाषा विभागाच्या सहसचिव श्रीमती अपर्णा गावडे, अवर सचिव हर्षवर्धन जाधव, कक्ष अधिकारी विनय भोसले, वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, विश्वकोश मंडळाचे सचिव शामकांत देवरे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळे उपस्थित होते. डॉ. ढेरे म्हणाल्या, साहित्यिक परंपरेची एक पाईक म्हणून मी कार्यरत राहिन. सध्याचे संमेलन यवतमाळ म्हणजे विदर्भात होत असल्याने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता साधेपणाने संमेलन करण्याचा
प्रयत्न असेल. संमेलन अध्यक्ष निवडीतील बदल हा स्वागतार्ह असून हीच परंपरा आधी असती तर अनेक थोर साहित्यिकांनाही संधी मिळाली असती, असे सांगून त्या म्हणाल्या, त्या सर्व थोर साहित्यिकांचा विनम्र आदर करत मी हे पद स्वीकारले आहे.

बदलाच्या या काळात संमेलनाचे स्वरूप ही बदलले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विश्वकोश मंडळासह वाईतील विविध संस्थांच्या वतीने डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष दिलीप करंबेळकर, सहसचिव अपर्णा गावडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्याव्यासंगी सहायक आनंद गेडाम, सरोजकुमार मिठारी आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. शामकांत देवरे यांनी स्वागत , सुत्रसंचालन जगतानंद भटकर यांनी तर वर्षा देवरुखकर यांनी आभार मानले. याप्रसंगी मराठी विश्वकोश मंडळासह वाई नगरपालिका, प्राज्ञपाठशाळा, रोटरी क्‍लब, उत्कर्ष पतसंस्था, वाई मेडिकल असोसिएशन, संस्कार भारती, लोकमान्य टिळक स्मारक संस्था, सहकार भारती, कन्या शाळा, द्रविड हायस्कूल, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, बापूसाहेब शिंदे विद्यालय, कृष्णाबाई संस्थान घाट, गोवर्धन संस्था, सावरकर प्रतिष्ठान, कृष्णाई कला मंच आदी संस्थांच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)