मराठा आरक्षणावर प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया

संघर्ष आणि बलिदानातून मिळालेला मोठा विजय – विखे पाटील                                                            मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कॉंग्रेस आघाडी सरकारच्या निर्णयावर आज विधीमंडळात पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, हा संघर्ष आणि बलिदानातून मिळालेला मराठा समाजाचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर हमखास टिकेल असे स्वतंत्र 16 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची मागणी होती. त्यामुळेच सर्व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाला एकमुखाने पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाचा नवीन कायदा सर्वांगिणरित्या परिपूर्ण असावा आणि तो लवकरात लवकर लागू व्हावा, या हेतूने आम्ही सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आम्ही सरकारवर दबाव निर्माण केला, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

…म्हणून मी फेटा बांधला नाही!: अजित पवार
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकारले आहे. ‘आरक्षणाच्या निर्णयात प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळे कुणी एकाने त्याचे श्रेय घेणे चुकीचे आहे. श्रेय घेण्याआधी सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असे सांगतानाच, ‘मलाही जल्लोषाचा फेटा बांधता आला असता. पण आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या 40 तरुणांचे बलिदान माझ्या डोळ्यांपुढे आहे,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दोन दशकांपासून सुरु असलेल्या लढ्याचे यश – धनंजय मुंडे
‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. विधानपरिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. मराठा आरक्षणाप्रमाणेच सरकारने धनगर आरक्षण प्रश्न सकारात्मकपणे हाताळावा असे आवाहन मुंडेंनी केले.

आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवला – विनोद तावडे
आज महाराष्ट्राच्या इतिहासातला आनंदाचा दिवस आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण भाजपा – सेनेच्या सरकारने आज जाहिर केले आहे. कोर्टात टिकेल असे हे आरक्षण आहे. आज आम्ही निवडणूकीत जाहीर केलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने खरा करून दाखविला, असे उद्गार महाराष्ट्राचे शिक्षण व सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांनी काढले.

सकल मराठा समाजाचे अभिनंदन! – अशोक चव्हाण
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात 58 मोर्चे काढले होते. त्यांच्या आंदोलनाला आणि संघर्षाला आज यश आले असून आज विधीमंडळात एक मताने मराठा आरक्षण कायदा मंजूर झाला. यासाठी मी मराठा समाजाचे अभिनंदन करतो. कॉंग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले, याचा आपल्याला अभिमान आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कॉंग्रेस आघाडी सरकारचा निर्णय आज पूर्णत्वास गेला, याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

भाजपाने वचन पाळले – रावसाहेब दानवे
सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली. भाजपाने विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व वैधानिक प्रक्रिया भाजपा सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण केली आहे, असे दानवे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
8 :blush:
0 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)