आरसीबुक परत आले, पण पुन्हा नाही सापडले

वाटपाचा घोळ : तक्रारदारांनी आरटीओ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन

– कल्याणी फडके

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – वाहनांच्या खरेदीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात येणारे “आरसीबुक’ (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) पोस्टातर्फे पाठविण्यात येते. पण, गेल्या सहा महिन्यांत 1 लाख 77 हजार 44 पैकी 8 हजार 54 “आरसीबुक’ पोस्टाकडून आरटीओकडे परत आले आहेत. अशातच काही नागरिकांनी त्यांचे आरसीबुक पोस्ट तसेच आरटीओमध्येही नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारदारांनी आरटीओमध्ये संपर्क साधल्यास त्यांना आरसीबुक शोधून दिले जाईल अन्यथा डुप्लिकेट दिले जाईल, असे सांगण्यात आले.

नवीन गाडी खरेदी केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून “आरसीबुक’ देण्यात येते. वाहनचालकांच्या पत्त्यावर ते पोहोचविण्याची प्रक्रिया स्पीड पोस्टामार्फत राबविण्यात येते. साधारण महिनाभरात ते घरपोच मिळेल, असे आरटीओकडून सांगण्यात येते.

महिनाभरात घरपोच न आल्यास पोस्टात जाऊन चौकशी करावी. यासाठी आरटीओतून बारकोड घेऊन तो पोस्टात दाखवावा लागतो. यानंतर पोस्ट बारकोडच्या सहाय्याने त्यांच्याकडील आरसीबुक शोधून नागरिकांना देते. पोस्टामध्ये डिलिव्हरी न झालेले आरसीबुक तीन महिन्यांपर्यंत असते. यानंतर ते आरटीओकडे परत जाते.

पोस्टाकडून अनेकदा वाहनचालकांचे पत्ते सापडत नाहीत, मोबाइल क्रमांक सुरू नसतात, घर बंद असते आदी कारणांमुळे आरसी बुकची रवानगी पुन्हा आरटीओकडे करण्यात येते. आरसी बुक घरपोच न मिळाल्यास वाहनचालकास आरटीओ तसेच पोस्टामध्ये फेऱ्या मारतो. पोस्टाकडून आरटीओकडे तर आरटीओकडून पोस्टाकडे अशी त्याची ससेहोलपट होते. यात तीन ते चार महिन्यांचा कालावधी गेलेला असतो. तर अनेकदा कारवाई दरम्यान गाडी पकडल्यास आरसीबुक नसल्याने भुर्दंडही भरावा लागतो. यामुळे दोन्ही ठिकाणी आरसीबुक मिळाले नाही तर दाद कोणाकडे मागायची हा प्रश्‍न पडत आहे.

गेल्या सहा महिन्यांत आरसीबुक परत येण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनचालकांनी पत्ता व्यवस्थित न दिल्याने आरसीबुक परत येतात. त्यामुळे वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पिनकोडसह पूर्ण पत्ता आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्‍यक आहे. पोस्टाकडून वाहनचालकांना मोबाइलवर बारकोड पाठविण्यात येतो. बारकोड मिळाल्यानंतर बरेच दिवस आरसीबुक न आल्यास, बारकोड मिळाल्याच्या दोन महिन्यांमध्ये वाहनचालकांनी पोस्टामध्ये चौकशी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा नागरिकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा.
– आनंद पाटील, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)