जामनगर(गुजरात): भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या वडील आणि मोठ्या बहिणीने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महिन्याभरापूर्वी रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनिरुद्धसिंह जडेजा आणि नैनाबा जडेजा यांनी कॉंग्रेसची निवड केली आहे. भाजपा शेतकरी, महिला आणि युवकांना दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळे आपण कॉंग्रेस पक्षाची निवड केली असल्याचे नैनाबा हिने सांगितले.
जामनगर येथे आयोजित एका जाहीर सभेत अनिरुद्धसिंह जडेजा आणि नैनाबा जडेजा यांनी हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जामनगर लोकसभा संघातील कॉंग्रेसचे उमेदवार मुलु कांडोरिया हेही हजर होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जामनगर दौऱ्याच्या पूर्वसंध्येला 3 मार्च रोजी रीवाबा सोलंकीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. करणी सेनेच्या महिला विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर पाच महिन्यांनी रीवाबाने राजकीय पक्षाच प्रवेश केला होता. रीवाबाने दिल्लीमधून अभियंत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. 17 एप्रिल 2016 रोजी रीवाबा आणि रविंद्र जडेजा यांनी विवाहबंधनात अडकले होते. जून 2017 रोजी त्यांना कन्यरत्न झाले होते.