#IPL2019 : मी त्याला नियमानुसार बाद केले – अश्‍विन

-‘बटलर-अश्‍विन’ वादावरुन गदारोळ
-सोशल मिडियावर अश्‍विनची खिल्ली

जयपुर – किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्‍विनने “मंकड्‌स’ पद्धतीने बाद केल्यानंतर या प्रकरणी एकच गदारोळ उडाला असून या वादावरुन सोशल मिडियावर अश्‍विनची खिल्ली उडवली जात आहे.

या विषयी सामन्यानंतर बोलताना अश्‍विनने सांगितले की, मी बटलरला मंकड्‌सच्या नियमानुसारच बाद केले. हा नियम आयसीसीच्या पुस्तकात असून मला वाटते मी काही चुकिचे केलेले नाही. मग या वरुन एवढा गदारोळ कशाला व्हायला हवा? क्रिकेटच्या या स्तरावर प्रत्येक सामना महत्वाचा आहे. सामना कोणत्याही क्षणी फिरु शकतो त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपल्या कृतीवर लक्ष ठेवायला हवे.

आयपीएलच्या मोसमातील चौथ्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान समोरा समोर होते. यावेळी पंजाबने दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने धडाकेबाज सुरूवात केली होती. यावेळी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर पंजाबच्या गोलंदाजांची पिस काढत असताना तेराव्या षटकांत रविचंद्रन अश्‍विनने नॉन स्ट्राईकला असलेला बट्‌लर गोलंदाजी करण्याआधी थोडा पुढे जात असल्याचे पाहून त्याला धावबाद केले. अश्‍विनने असे केल्यानंतर बटलर आणि अश्‍विनमधे वादा वादी झाली. या मधे पंचांनी हस्तक्षेप करत प्रकरण तिसऱ्या पंचांवर सोपवले. यावेळी तिसऱ्या पंचांनी बटलरला बद ठरवल्यानंतर या बद्दल आणखिनच गदारोळ वाढला होता.

वास्तविक पहाता जर बट्‌लर चेंडू टाकण्यापुर्वीच आपली क्रिझ सोदत असेल तर त्याला पहिल्यांदा वॉर्निंग देणे संयुक्तीक झाले असते. मात्र, अश्‍विनसारख्या अव्वल दर्जाच्या गोलंदाजाने असा रडीचा डाव खेळल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. अश्‍विनने बटलरला बाद केल्यानंतर सामन्याचे सर्व चित्रच पालटले होते. बटलर असे पर्यंत सामना जिंकण्याच्या परिस्थितीत असलेल्या राजस्थानच्या संघाला सामना 14 धावांनी गमवावा लागल्यानंतर सदर प्रकरणाची आणखिनच चर्चा होउ लागली आहे.

या वादात नियमानुसार बट्‌लर बादच होता. कारण अश्विनने आपली बॉलिंग ऍक्‍शन पूर्ण केली नव्हती त्यामुळे बट्‌लर धावबाद होणार होता. मात्र, अशा प्रकारच्या विकेटमध्ये गेम ऑफ स्पिरिटचा विषय येतो. कारण अशाप्रकारे बाद करण्यात गोलंदाजाचे काहीच कसब नसते. मग एका जागतिक स्तरावर नाव कमावलेल्या अश्‍विन सारख्या खेळाडूने एखाद्या फलंदाजाला असे बाद केल्याने चाहत्यांना धक्‍का बसला.

दरम्यान या प्रकरणी अश्‍विनची सोशल मिडियावर भरपुर प्रमाणात खिल्ली उडवली जात असून जर अश्‍विनला बटलरला बाद करता येत नव्हते तर त्याने बटलरला बाद होण्याची विनंती करायला हवी होती असे म्हणन्या पासून ते अश्‍विन सध्या भारतीय संघात का नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे इथ पर्यंत त्याची खिल्ली उडवली गेली आहे. तर, काहिंनी 2012 साली अश्‍विनने अशाच प्रकारे श्रीलंकेच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर सचिन आणि सेहवागने अंपायरला विनंती करुन ती अपील माघारी घेत फलंदाजाला जिवदान दिल्याचा किस्साही सांगत स्पोर्टमन शिप चे उदाहरण दिले होते.

“मंकड्‌स’ नियम काय सांगतो

आसीसीच्या 41.16 या नियमात एप्रिल 2017 मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला फलंदाज चेंडू पडण्यापूर्वी क्रीझ सोडून पुढे गेला असेल आणि गोलंदाजांला चेंडू टाकण्याची ऍक्‍शन करण्यापूर्वी ते लक्षात आल्यास, गोलंदाज धावबाद करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)