#CWC19 : फिरकीचा सामना करण्यासाठी शास्त्रींकडून धोनीला गुरूमंत्र

मॅन्चेस्टर – यंदाच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी फिरकी गोलंदाजांसमोर चाचपडत खेळताना दिसला आहे. त्यामुळे धोनीला वेगाने धावा करण्यात अपयश आल्याने त्याच्यावर टीका होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धोनीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबरोबर चर्चा केली. सराव शिबिराच्या वेळी धोनीने शास्त्रींबरोबर फिरकी गोलंदाजी कशी खेळायची यावर सविस्तर चर्चा केली.

शास्त्री आपल्या हाताचे मनगट वळवून फिरकीला कसे सामोरे जायचे त्याबद्दल धोनीला मार्गदर्शन करत होते. धोनीसुद्धा त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकत होता. जवळपास 20 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर धोनी खेळपट्टीच्या दिशेने गेला तर शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये गेले. मधल्या षटकात फिरकी गोलंदाजी सुरू झाल्यानंतर धोनीचा खेळ अडखळत असल्याकडे सचिनने लक्ष वेधले होते.

धोनी संघातील वरिष्ठ खेळाडू असून सध्या त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. टीम इंडियाने विश्‍वचषक स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली असली तरी अनेकांच्या मनात धोनीच्या फलंदाजीबद्दल शंका आहे. धोनीने यंदाच्या विश्‍वचषकात उपयुक्‍त खेळ केला असला तरी मोक्‍याच्या क्षणी मोठे फटके मारण्यास तो अपयशी ठरत असल्याने तो टीकेचा धनी बनत होता. संघाला गरज असताना वेगाने धावा बनवण्याबरोबर मोठे फटके खेळत नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी मोठे फटके खेळण्याची गरज असताना धोनीने आपल्या खेळाची गती वाढवली नाही म्हणून त्याच्यावर टीका झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)