रवी पुजारीचे प्रत्यार्पण लांबणार 

अँथनी फर्नांडिस असल्याचा सेनेगल सरकारसमोर दावा

नवी दिल्ली  – अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने आपण अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा सेनेगल सरकारसमोर केला आहे. यामुळे पुजारीच्या प्रत्यार्पण लांबण्याची शक्‍यता आहे. आफ्रिका खंडातील सेनेगल येथे काही दिवसांपूर्वी रवी पुजारीला अटक करण्यात आली होती.

आपण बुर्किना फासोचे (पश्‍चिम आफ्रिकन देश) रहिवासी असल्याचा दावा पुजारीच्या वतीने सेनेगल न्यायालयात करण्यात आला आहे. पुजारीच्या वकिलाने तसा पासपोर्ट सादर केला आहे. रवी पुजारीने आपली ओळख लपवल्याने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या कारवाईला उशीर होऊ शकतो. रवी पुजारीला 22 जानेवारीला अटक केल्यानंतर 26 जानेवारीला भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणा रवी पुजारीवर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवून होती.

परराष्ट्र मंत्रालय सेनेगलमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. रवी पुजारी गॅंगच्या गुन्ह्यांची माहिती, इंटरपोलने बजावलेल्या 13 रेड कॉर्नर नोटिसा, मुंबई आणि कर्नाटक पोलिसांनी प्रत्यापर्णासंदर्भात पाठवलेली पत्रं आणि पुजारीच्या खोट्या पासपोर्टविषयी माहिती देणारी कागदपत्रं सेनेगल सरकारसमोर सादर केली आहेत. पुजारीच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने तातडीने गोळा करुन प्राधान्याने सेनेगल सरकारला पाठवण्याचे आदेश मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या बहिणी जयलक्ष्मी सलियन आणि नयना पुजारी यांच्या डीएनए टेस्ट होण्याची शक्‍यता आहे. पुरावे जमा करण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्यार्पण लांबण्याची भीती आहे. भारतीय यंत्रणा मात्र पुजारी तडिपार व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. तडिपारीच्या प्रक्रियेमध्ये एखादा देश अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकाला देशातून बाहेर हाकलून देतो, तर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेमध्ये संबंधित देशातील सरकार दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)