रत्नागिरी हापूसची हंगामातील पहिली मोठी आवक

पुणे – रत्नागिरी हापूसची मार्केट यार्डात हंगामातील पहिली मोठी आवक रविवारी (दि. 21) झाली. बाजारात साडेपाच ते सहा हजार पेट्या दाखल झाल्या. आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्याने भावात दहा टक्क्‌यांनी घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत रत्नागिरी हापूसची आवक आणखी वाढणार असून, लवकरच दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुणकेश्वर, पावस, संगमेश्वर, मिरेबांदर, सावंतवाडीसह विविध भागातून ही आवक झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या हापूसचा दर्जा आणि आकारही चांगला असल्याचे सांगून व्यापारी अरविंद मोरे म्हणाले की, दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंबा उशिरा बाजारात दाखल झाला आहे. एप्रिलच्या तीन आठवड्यानंतर झालेली आवक ही हंगामातील पहिली मोठी आवक आहे. सध्यस्थितीत बाजारात दाखल होत असलेल्या कच्च्या हापूस पेटीचा भाव 4 ते 8 डझनास 1200 ते 3500 रुपये भाव मिळाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत दुपटीने वाढ झाली असून दरात पेटीमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी घट झाल्याचे अडतदार नाथ खैरे यांनी सांगितले.

बाजारात तयार हापूसही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगून अडतदार युवराज काची म्हणाले, मुंबईतील मार्केट बंद असल्याने बाजारात रत्नागिरी हापूसची आवक वाढली आहे. अक्षय्यतृतीयेपर्यंत मोठ्या प्रमाणात तयार आंबा बाजारात उपलब्ध होईल असे चित्र सध्या दिसून येत आहे. सध्या घाऊक बाजारात 4 ते 8 डझनाच्या तयार पेटीला दोन ते 2 हजार 500 रुपये आणि 5 ते 10 डझनाच्या पेटीस 2 हजार ते 4 हजार 500 रुपये भाव मिळत आहे. अक्षयतृतीयेपर्यंत हे भाव आणखी कमी होतील, असा अंदाज आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)