महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशनचे धान्य

शासनाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश : हयगय करणाऱ्यांवर होणार कारवाई

नगर: महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाऱ्या दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाऱ्या दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे.

रेशनवर गहू, तांदूळ, डाळ असे धान्य ग्राहकांना वाटप केले जाते; परंतु बहुतांश दुकानदार हे रेशनवरील धान्य महिन्यातील काही दिवसांपर्यंतच वाटून नंतर दुकान बंद करणे किंवा धान्य शिल्लक न ठेवणे असे प्रकार करीत आहेत. या संदर्भात सन 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार शिवाजीराव नाईक यांनी रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सक्ती व जबाबदारी रेशन दुकानदारांवर टाकावी, अशी सूचना केली होती. त्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अवर सचिव पी. जी. चव्हाण यांनी नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे.

त्यामध्ये ग्राहक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशनवरील धान्य घेण्यास आल्यावर त्याला धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्यास संबंधित दुकानदारांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे दुकानदारांना कळविण्यात आल्याचे म्हटले आहे. ग्राहकाच्या सोयीसाठी रेशन दुकाने आहेत. त्यामुळे ती महिनाभर सुरू असली पाहिजेत, अशीच ग्राहकांची भावना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)