स्टाईल मारण्यापेक्षा उद्योग, रोजगार निर्मिती करणार

नरेंद्र पाटील यांचे आश्‍वासन : टोलच्या आर्थिक रसदीचा गैरवापर झाला

सातारा – मला स्टाईल वैगरे माहीत नाही. मात्र, स्टाईल मारण्यापेक्षा माझा भर जिल्ह्यात उद्योग आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर असेल, असे आश्‍वासन ना. नरेंद्र पाटील यांनी दिले. दरम्यान, महामार्गावरील टोलनाक्‍यातून मिळणाऱ्या आर्थिक रसदीचा वापर गैरकारणांसाठीच अधिक झाला असून आपण खासदार होताच जिल्ह्यातील वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ही पाटील यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपच्यावतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पुरुषोत्तम जाधव, ना. नितीन बानुगडे-पाटील, ना. शेखर चरेगावकर, आ. शंभुराज देसाई, महेश शिंदे, विक्रम पावसकर, चंद्रकांत जाधव, विजय काटवटे, बाळासाहेब शिंदे, अनुप सूर्यवंशी, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात दहशत मुक्त व्यवसाय आणि कामगारांना हक्काचा मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. आज जिल्ह्यात उद्योजक दहशतीखाली आहेत.

त्याचे कारण कोण जेलमध्ये गेले, कोणावर सोना अलाईन्स कंपनीतील खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि कोण कोणाच्या बंगल्यावर गेले, याचे परिक्षण केले तर उत्तर मिळते, असे सांगून पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात उद्योग न आल्यामुळे युवक बेरोजगार झाला आहे. तर जे रोजगार सुरू आहेत त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने होणाऱ्या गुंडगिरीचा सामना करावा लागत आहे. त्या गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यात येईल. त्याचबरोबर मेडीकल कॉलेज देखील लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर कोयना धरणग्रस्तांना वांग-मराठवाडीच्या धर्तीवर पुर्नवसन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत.

त्याबाबत विद्यमान खासदारांनी पाठपुरावा केला नाही. परंतु आपण कायम प्रयत्नशील राहणार आहे. सातारा जिल्हा ऐतेहासिक जिल्हा आहे. मात्र, जिल्ह्याचे नाव खऱ्या अर्थाने ऐतिहासिक करण्यात यावे, यासाठी देखील प्रयत्न झाले नाहीत. ऐतिहासिक वास्तू व निसर्गाच्या सहाय्याने जिल्ह्यात अधिकाधिक पर्यटन रोजगार उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील माथाडी कामगार आपल्या सोबतच राहणार असल्याचे पाटील यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले. ते म्हणाले, 1999 च्या जावली विधानसभेच्या निवडणूकीत माथाडी कामगार एकवटला होता. त्याप्रमाणे या निवडणुकीत ही एकजूट व पाठींबा दिसेल, असे सांगून पाटील म्हणाले, शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील हे कधी उदयनराजे तर कधी आ. शिवेंद्रसिंहराजे तर कधी आ. मकरंद पाटील यांच्या सोबत असल्याचे छायाचित्र पाहण्यास मिळत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत ते आपल्या सोबत येतील. नाही आले तर वरिष्ठ नेते त्यांच्याबाबतचा निर्णय घेतील, असे पाटील यांनी सांगितले.

आमच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात शिवसेना कशाप्रकारे लढत देईल, असा प्रश्‍न नितीन बानुगडे-पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आमचा विरोध राष्ट्रवादीच्या उमेदवाराला असणार आहे. आमचा विरोध येथील बेरोजगारी आणि समस्यांच्या विरोधात असणार आहे. देशाला स्थिर सरकारची आवश्‍यकता आहे. त्यासाठी साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक युतीचे खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले.

तुम्ही म्हणजेच मी

आ. शंभूराज देसाई पत्रकार परिषदेला उशिरा आले. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, आ. देसाईंचा मुख्यमंत्र्यांशी चांगला स्नेह आहे. त्यामुळे ते माझ्यासोबतच आहेत, असे सांगत असतानाच आ. देसाई त्या ठिकाणी आले. त्यावर पत्रकारांनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, देसाई यांनी पाटील यांना म्हणाले, अहो तुम्ही खासदार म्हणजेच मी आहे. पाटण विधानसभेच्या निवडणुकी एवढे किंवा त्यापेक्षा अधिक मताधिक्‍क्‍य पाटील यांना मिळवून देणार, असे देसाई यांनी आश्‍वासित केले.

तीस तारखेला उमेदवारी अर्ज भरणार

पत्रकार परिषदेला मित्र पक्षांचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्याशी संवाद साधला आहे. ते पुण्याला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, लवकरच रिपाइंसह रासप, शिवसंग्राम अन्‌ रयत क्रांतीला सोबत घेऊन प्रचाराला सुरुवात होईल, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, येत्या 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे बानुगडे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे स्वाभाविक महायुतीच्या शक्तीप्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)