रताळींचे उत्पादन, आवक निम्म्याने घटली

दुष्काळाचा फटका : भाव मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर

पुणे – आषाढी एकादशीसाठी मार्केट यार्डात रताळांची आवक सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आणि कर्नाटक येथील बेळगाव भागातून ही आवक होत आहे. यावर्षी असलेल्या दुष्काळाचा फटका रताळ्याच्या पिकाला बसला आहे. नेहमीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन झाले आहे. परिणामी आवकही गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्धीच झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे 30 ते 32 गाड्यांची आवक झाली होती. ती यावर्षी घटून 16 ते 17 गाडी झाली आहे. आवक घटली असली, तरीही भाव मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे संचालक आणि तरकारी विभागातील व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.

शुक्रवारी (दि.12जुलै) आषाढी एकादशी आहे. या पार्श्‍वभूमीवर करमाळा तालुक्‍यातील मांजरागव आणि उंदरगाव येथून 10 ते 12 गाड्यांची, तर बेळगाव येथून 4 ते 5 ट्रकची आवक झाली आहे. याविषयी अमोल घुले म्हणाले, आषाढी एकादशीच्या दिवशी बहुतांश लोक उपवास करत असतात. त्यामुळे या काळात उपवासासाठी रताळीला जास्त मागणी असते. राज्यातील म्हणजे सध्या करमाळा भागातून आलेली रताळी गावरान, गोड, चवदार, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ती ग्राहकांच्या पसंतीस पडतात. त्यामुळे त्यांना बेळगाव रताळींपेक्षा जास्त भाव मिळतो. त्या रताळांना घाऊक बाजारात प्रती किलोस 35 ते 40 रुपये भाव मिळत आहे. तर, कर्नाटक रताळी आकाराने मोठी असतात. ती चवीला थोडीशी तुरट असतात. त्यामुळे त्यांना राज्यातील रताळींपेक्षा तुलनेने कमी 20 ते 30 रुपये भाव मिळत आहे.

दुष्काळामुळे उत्पादनात घट
रताळी पिक तयार होण्यास सात ते साडेसात महिन्यांचा कालावधी लागतो. केवळ सेंद्रिय खताचा वापर या पिकासाठी केला जातो. एकादशीला रतळ्यांणा मागणी असते. त्यामुळे आषाढी एकादशीच्या पूर्वी तीन आठवडे पीक कसे येईल, हे विचार करून लागवड करावी लागते. या पिकाला पाणी भरपूर लागते. मात्र, यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे करमाळा भागात रताळ्यांची कमी लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या ठिकाणीही कमी उत्पादन झाले आहे. मी दोन एकरमध्ये लागवड केली होती. त्याला उन्हाळ्यामध्ये टॅंकरने विकत घेऊन पाणी घालावे लागते. त्यातून नव्वद पोती उत्पादन झाले आहे. नियमितचा विचार केल्यास 200 पोती उत्पादन निघणे अपेक्षित होते. उत्पादन घटूनही भावही अपेक्षित मिळालेला नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे, अशी खंत मांजरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील गोरख जगताप यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)