दुर्मिळ रक्‍तगटाच्या अवलियाची देशभर भ्रमंती

– शेरखान शेख

शिक्रापूर – अनोखा रक्‍तगट म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्‍तगटाचे क्‍वचितच व्यक्‍ती भारतात आहेत. संपूर्ण भारतात दोनशे दहा व्यक्‍ती तर महाराष्ट्रात एकवीस व्यक्‍ती या रक्‍तगटाचे असून यापैकीच एक गणेश लोखंडे हे आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह परराज्यात जाऊन गरजू रुग्णांसाठी तब्बल बत्तीस वेळा रक्‍तदान करून नागरिकांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. या अवलीयाची देशभर भ्रमंती सुरू आहे. ही रक्‍तदान चळवळीसाठी दिशादर्शक ठरत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील गणेश बबन लोखंडे यांनी 2003 मध्ये प्रथमच शिक्रापूर येथील एका रक्‍तदान शिबिरात रक्‍तदान केले. त्यांनतर चार ते पाच दिवसांतच रक्‍तदान शिबिरासाठी सहाय्य करणाऱ्या ब्लड बॅंकेच्या संस्थेचे काही अधिकारी गणेश लोखंडे यांना शोधत शिक्रापूर येथे आले. त्यावेळी तुम्ही रक्‍तदान केले. त्यामुळे आम्ही खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो, असे ऐकून गणेश यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. त्यानंतर गणेश यांना आपला रक्‍तगट हे अनोखा असून भारतातील दोनशे दहा व्यक्‍ती व महाराष्ट्रातील एकवीस व्यक्‍तीपैकी आपण एक आहे आणि बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्‍तगटाचे रक्‍त प्रत्येक रक्‍तगटाच्या व्यक्‍तीला चालते. परंतु बॉम्बे ब्लड ग्रुप रक्‍तगट असलेल्या व्यक्‍तीला फक्‍त बॉम्बे ब्लड ग्रुप रक्‍तगटाचेच रक्‍त लागते, हे समजले. त्यावेळी आपण केलेले रक्‍तदान हे भारतातील सर्व रक्‍तदात्यांपेक्षा जास्त महत्वाचे आहे, असे लक्षात आले. शिक्रापूर येथे खास गणेश लोखंडे यांना भेटण्यासाठी आलेल्या ब्लड बॅंके संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गणेश यांना गरजेनुसार व काही हॉस्पिटलमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुप रक्‍तगटाच्या रुग्णांना रक्‍ताची गरज भासल्यास रक्‍तदान करणार का, असे विचारले. त्यावेळी गणेश लोखंडे यांनी क्षणातच मी कधीही रक्‍तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले.

मला विशेष सन्मान- गणेश लोखंडे
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी रक्‍तदान करण्यासाठी गेलो असताना अनेक ठिकाणी जास्त महिला रुग्ण असल्याचे निदर्शनास आले. अनेकांना माझ्या रक्‍तदानामुळे जीवनदान मिळाले याचा आनंद वाटतो, मी आतापर्यंत भरपूर ठिकाणी रक्‍तदान करण्यासाठी गेलो आहे. त्या प्रत्येक ठिकाणी मला विशेष सन्मान मिळतो याचा आणि माझ्या रक्‍तदानाचा मला आनंद वाटतो, असे गणेश लोखंडे यांनी आवर्जून सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)