नागपूरमध्ये बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार पीडितेची आत्महत्या

नागपूर – एका बलात्कार पीडितेने नैराश्‍यात आणि बदनामीच्या भीतीपायी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी पीडितेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याअंतर्गत एका बलात्कार पीडितेने काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी या 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. बलात्कार झाला तेव्हापासून ती नैराश्‍यात होती. 15 फेब्रुवारी रोजी तिच्या ओळखीच्या मयूर कुलरकर नावाच्या तरुणाने तिला भेटण्यासाठी मारोडी बस स्टॉपजवळ बोलावले होते. पीडित तरुणी मयूरवर विश्वास ठेऊन त्या ठिकाणी भेटायला गेली. मयूरने त्याच्या आणखी दोन मित्रांच्या मदतीने तरुणीला एका फेब्रिकेशनच्या दुकानाच्या आवारात नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बलात्काराचे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर त्यासंदर्भातली बातमी प्रकाशित झाल्याने पीडित तरुणी खूप तणावात होती. येत्या 10 मार्च रोजी त्या तरुणीचे लग्न होणार होते. लग्नाच्या काही दिवस आधी अशी दुर्दैवी घटना घडल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला सुनावले. त्यामुळे आधीच तणावात असलेली पीडित तरुणी आणखी नैराश्‍यात गेली. त्यामुळे तिने रविवारी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, पीडितेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला उद्देशून लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये मुख्य आरोपी मयूरला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी मित्राला भेटायला गेल्यामुळे आईची माफीसुद्धा मागितली आहे.पोलिसांनी पीडित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल करत त्याचाही तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)