आजच्या व्हायरल व्हिडिओ कट्टयावर आज आपण जाणून घेणार आहोत एका मराठमोळ्या रॅप बद्दल… गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ह्या रॅप ने चांगलाच धुमाकूळ घातला असून, हा रॅप सर्वांच्याच काळजाला भिडला आहे. कारण शेतकऱ्यांच्या घुसमटणाऱ्या असंतोषाला वाचा फोडणारा हा रॅप आहे.
हे रॅप सॉंग कुणा मुंबई- पुण्याच्या तरुणाने बनवले नसून उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने हा रॅप बनवला आहे. या रॅपमधून अजित शेळकेने शेतकऱ्यांच्या दररोजच्या व्यथा मांडल्या आहेत. सांगा शेती करू कशी? पोटाची खळगी भरू कशी… असं अजित गाण्यात म्हणतोय. गाण्याचं शूटिंग शेतात आणि बाजारात केलं असल्यामुळे गाण्याला फुल्ल गावाकडच्या मातीचा गंध जडला आहे. अजितने यापूर्वी स्वतः पाच गाणी तयार केली असून, हे त्याचं सहावं रॅप सॉंग आहे.
मात्र या तीन मिनिटाच्या गाण्याचे शब्द देखील तितकेच प्रभावी असून या गाण्याच्या व्हिडिओमध्ये शेतात काम करणारे शेतकरी आणि बाजारात काम करणाऱ्या सामान्यांना चित्रित केले आहे. तसेच, लोकं कोथिंबीरीची जुडी घेताना देखील शेतकऱ्यांबरोबर दोन-तीन रुपयांसाठी बारगेनिंग करतानाचंसुद्धा चित्रिण करण्यात आलं असल्याने गाण्याचा व्हिडीओ अधिकच प्रभावी वाटतो आहे.
सध्या हे रॅप सॉंग जोरदार व्हायरल होत असून, याला युट्युबवर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गाण्याला आतापर्यंत जवळपास 1.3 लाख हिट्स मिळाले आहेत.