रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपाच्या वाटेवर?

सातारा/फलटण –लोकसभेच्या तोंडावर सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसला पुन्हा झटका बसला आहे. दोनच महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेले कॉंग्रेसचे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपात डेरेदाखल होण्याची शक्‍यता असून त्यांच्या प्रवेशाची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. दरम्यान, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची भाजपकडून लोकसभा उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. येत्या सोमवारी मुंबईत रणजितसिंह यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यापासून माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढलेला होता. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी आपल्या उमेदवारीची तलवार म्यान केल्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळ्या वाढल्या होत्या. तर्कवितर्कांना उधाण आले होते. असे असतानाच जिल्हा कॉंग्रेसमधील कद्दावर युवा नेते तथा सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ काही दिवसांपासून बांधली जात होती. त्या अटकळी व शक्‍यतांना आजअखेर दुजोरा मिळालेला आहे. कालपासूनच रणजितसिंह नाईक निंबाळकर दिल्लीत तळ ठोकून होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढ्यातून लढण्याबाबत ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आता केवळ भाजपा प्रवेशाची औपचारिकता बाकी राहिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. आता त्यांच्या पाठोपाठच रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपात प्रवेश करीत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसची पूर्णत: वाताहात झाली आहे. माढ्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेले संजय शिंदे व भाजपात नुकतेच डेरेदाखल झालेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये माढा लोकसभेला फाईट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)