फलटण: माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन घरी, कारखान्यावर का डेअरीवर येऊ असे आव्हान विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले. खासदरांनी एक हजार रुपये तयार ठेवावेत हे माझे उघड आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले. फलटण तालुक्यातील जनतेने विरोधकांना घाबरुन जाऊ नये, तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली.
येथील अनंत मंगल कार्यालयातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, “महानंदा’चे उपाध्यक्ष डी. के. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रामराजे पुढे म्हणाले, “”रणजितसिंह यांनी डीएनएची भाषा करु नये, त्यांचे वक्तव्य त्यांच्याच अंगलट येईल.” रणजितसिंह याने मला काय बोलायाचे ते बोलावे, भाडोत्री माणसाला बोलायला सांगू नये, अशी टीका जयकुमार गोरे यांचे नाव घेऊन केली. रणजितसिंह यांचा उजवा हात दिगंबर आगवणे यांना त्यांनी “दीडफुटी’ असे संबोधले.
“”तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी माझी हयात धोम बलकवडीसाठी घालवली आहे. मी युवकांना व्यसनाच्या आहारी लावले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने माझ्या आजपर्यंतच्या कामाची पोचपावती देऊन विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे,” अस आवाहन त्यांनी केले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीसुद्धा रणजितसिंह यांच्यावर टीका करुन जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगितले. फलटणचे राजघराणे हे जात पात न मानणारे असून आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे हे प्रगल्भ विचाराचे होते.
किती कामे केली याचा कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे. राजेगट एकत्र करूनच आपणाला काम करावे लागेल ती जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, विलास नलवडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, महादेव माने, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, सुधीर अहिवळे, पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर आदी प्रमुख उपस्थित होते.