स्वयंघोषित संत रामपाल दोन हत्या प्रकरणात दोषी 

पुढील आठवड्यात होणार शिक्षेची सुनावणी 
गुरुग्राम: हरियाणातील सतलोक आश्रमाचा प्रमुख आणि स्वयंघोषित संत रामपाल याला दोन हत्या प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. हिसार जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे. संत रामपालला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते. सतलोक आश्रमात उफाळलेल्या हिंसाचारात सहा महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.
विशेष न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संत रामपाल प्रकरणी सुनावणी केली. रामपाल जेल क्रमांक दोनमध्ये असून जेल क्रमांक एकमध्ये कोर्ट स्थापन करण्यात आले होते. पुढील आठवड्यात शिक्षेची सुनावणी होणार आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी हिसारमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला होता. बाबा राम रहीमच्या निकालानंतर पंचकुलात जो प्रकार घडला, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. हिस्सार न्यायालयाने रामपालची सरकारी कार्यात अडथळा आणणे आणि आश्रमात महिलांना जबरदस्तीने डांबून ठेवणे या दोन खटल्यातून मुक्तता केली होती. मात्र, देशद्रोह आणि हत्येचा खटला कायम होता.
हिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामपालच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र आश्रमात घुसून रामपालला अटक करण्यास नोव्हेंबर 2014 मध्ये समर्थकांनी पोलिसांना जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्येही धुमश्‍चक्री उडाली. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. अखेर पोलिसांनी जीवाचं रान करून तीन दिवसांनी बाबा रामपालला अटक केली होती. आश्रमाच्या दारावर ऍम्ब्युलन्स नेऊन पोलिसांनी रामपालला थेट ऍम्ब्युलन्समधूनच नेले. यावेळी बाबा रामपालच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.
रामपालच्या समर्थकांनी ऑगस्ट 2014 मध्ये हिस्सार जिल्हा न्यायालयात हुल्लडबाजी केली होती. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने रामपालला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. इतकंच नाही तर जामीन रद्द का करु नये, अशी विचारणाही केली होती.
दरम्यान, रामपाल यापूर्वी अनेक वादांमुळे चर्चेत होता. इस्लाम धर्माचे प्रचारक डॉ. झाकिर नाईक आणि अन्य धर्म गुरुंवर केलेल्या टीकांमुळे रामपाल चर्चेत होता. रामपालने 2006मध्ये स्वामी दयानंद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या समर्थकांमध्ये सतलोक आश्रमाबाहेरच राडेबाजी झाली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)