रामभक्‍त रामदास

नवव्या-दहाव्या दशकात भारताचा भरभराटीचा काळ होता. पराक्रमी राजे, बुद्धिमान शास्त्रज्ञ होते. विद्या, कला यांबरोबरच भारताचा जगभरातील व्यापार वाढलेला होता. परंतु नंतर वारंवार होत असलेल्या परकीय आक्रमणांमुळे देशात उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले. अशा वेळी समर्थ रामदास यांनी देशात पुन्हा चैतन्य निर्माण केले. आज रामनवमी. त्या निमित्ताने श्रीरामाचे निष्ठावंत भक्त नारायण सूर्याजी ठोसर म्हणजेच समर्थ रामदास यांचे स्मरण करू या.

भारतास पुन्हा ऐश्‍वर्य प्राप्त व्हावे, अशी रामदासांची आकांक्षा होती. त्यासाठी मराठा तितुका मेळवावा असा संदेश त्यांनी पसरवला. त्या काळात जनसंपर्काची साधने नव्हती. मग भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक घरे जोडली. समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मुस्लिमांची आक्रमणे परतवून लावण्यासाठी त्यांनी चाफळच्या रामाचा उत्सव सुरू केला.
ज्ञान, बल आणि शील यांची जोपासना व्हावी यासाठी समर्थांनी स्वतः अकरा प्रमुख मारुती मंदिरे स्थापन केली. दोन हजारांच्या वर त्यांनी मठ स्थापन केले. एक प्रकारे त्यातून त्यांनी गावांसाठी संरक्षणव्यवस्थाच उभी केली. लोकशिक्षण आणि समाजसंघटन ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींचे महत्त्व त्यांनी जाणले होते व ते त्यांनी करून दाखवले.

रामदास स्वामी हे प्रतिभावान साहित्यिक होते. त्यांच्या वाङ्‌मयात रोखठोकपणा आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेले करुणाष्टक तर मराठी वाङ्‌मयातले एक देखणे शिल्प आहे. त्यांच्या या काव्यातून करुणा झिरपते आहे. त्याचबरोबर “धबाबा तोय आदळे’ हे काव्य मूर्तीमंत चित्रमय शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. “राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तद्‌नंतरे’; “बहुजन सुखाय बहुजन हिताय’ अशी त्यांची कित्येक सुभाषिते म्हणजे मराठी भाषेचे लेणे आहे.

लोकांच्या मनात राष्ट्रभावना रुजण्यासाठी समर्थांनी लोकजागृती केली. मी स्वदेशाचे काही देणे लागतो, माझी समाजाप्रती काही बांधिलकी आहे ही भावना जोपासली गेली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अशा नागरिकांची संघटना म्हणजे राष्ट्र असे ते म्हणतात. आक्रमकांचे पारिपत्य करून आनंदवनभुवन निर्माण झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी तालमींचे आखाडे स्थापन केले. मठ, मंडळ्या तयार केल्या.

समर्थांनी शक्तीला प्राधान्य दिले. “शक्तीने मिळती राज्ये। युक्तीने सर्व होतसे। शक्ती युक्ति जये ठायी। तेथे श्रीमंत नांदती।’ असे त्यांनी सांगितले. त्यासाठी धनुर्धारी श्रीरामाची आणि हनुमंताची उपासना करण्याचा पुरस्कार केला. शक्तीरूपाच्या उपासनेतून समाज बलवान झाला पाहिजे अशी समर्थांची धारणा होती. आळसाचा त्यांना तिटकारा होता. यत्न तो देव जाणावा असे म्हणून समाजाला त्यांनी क्रियाशील बनवले. “मारता मारता मारावे। तेणे गतीस पावावे।’ असे म्हणून ते वीरवृत्ती जागवीत. “उत्कट भव्य तेचि घ्यावे, मिळमिळीत अवघेचि टाकावे’ या शब्दात त्यांनी मराठी माणसाची महत्त्वाकांक्षा जागवली. “महाराष्ट्रधर्म वाढवावा’ असा गजर करीत ते भारतभर फिरले. मरगळलेल्या मनांना त्यांनी चैतन्य दिले. वैराग्य आणि विवेक यांवर त्यांचा भर होता. ते नुसते भक्तीला अनुसरत नाहीत. प्रयत्न, कर्म आणि ज्ञान यांचीही भक्तीला जोड पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. शिवाजीराजांच्या कार्याला त्यांच्यामुळे बळ आले. स्वामी समर्थ रामदासांनी स्वराज्याचे, समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे हेच आता आपले ध्येय असले पाहिजे.

– माधुरी तळवलकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)