छत्तीसगड मध्ये रमणसिंह ऐवजी नवीन नेता निवडण्याचा भाजपचा प्रयत्न

रायपुर: छत्तीसगड मध्ये रमणसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा दारूण पराभव झाल्याने आता विधानसभेतील भाजप पक्षाचे नेतृत्व रमणसिंह यांच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याकडे देण्याचा विचार भाजप करीत असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 90 पैकी केवळ 15 जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर रमणसिंह यांची राज्यातील पंधरा वर्षांची राजवट संपुष्ठात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्तीसगड मध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद आता रमणसिंह यांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या अनुभवी नेत्याकडे देण्याचा प्रस्ताव भाजप नेतृत्वाच्या विचाराधिन आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पदासाठी आता ब्रिजमोहन आगरवाल आणि अजय चंद्राकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या खेरीज अदिवासी नेते नानकीराम कंवर आणि शिवरत्न शर्मा यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यापैकी आगरवाल हे सर्वात ज्येष्ठ भाजप नेते आहेत. ते विधानसभेवर आत्तापर्यंत सात वेळा निवडून आले आहेत त्यामुळे त्यांच्याकडेच हे नेतृत्व द्यावे अशी काही जणांची मागणी आहे.

अखंड मध्यप्रदेश सरकार मध्ये ते काही काळ मंत्रीही होते. चंद्राकर हे चार वेळा पक्षाचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले आहेत. रमण सिंह यांच्या सरकार मध्ये ते पाच वर्ष मंत्री होते तर शर्मा हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजप विधीमंडळ पक्षाची 2 किंवा 3 जानेवारीला बैठक होत असून त्यात नवीन नेता निवड केली जाईल अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)