दृष्टीक्षेप: राजकीय कुरघोडीपुरतेच राममंदिर? 

राहुल गोखले 

अयोध्येतील बाबरी ढाचा कारसेवकांनी पाडला त्याला 26 वर्षे झाली. एवढ्या काळात शरयू नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भारतीय जनता पक्षाची वेगाने वाटचाल अयोध्या आंदोलनानेच झाली; मात्र रा. स्व. संघ, विहिंप किंवा भाजप अयोध्येत राम मंदिराची उभारणी करू शकले नाहीत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला केंद्रात स्वबळावर बहुमत मिळाले. जे राम मंदिर आंदोलनानेदेखील साध्य झाले नाही ते भाजपने विकासाच्या आणि “अच्छे दिना’च्या आमिषाने करून दाखविले. आता मात्र अयोध्येचा मुद्दा राजकीय कुरघोडीसाठीच वापरला जात आहे. 

आता लोकसभा निवडणुका जवळ येत असताना विकासापेक्षा राम मंदिरासारखे मुद्दे पुढे येऊ लागले आहेत. एका प्रकारे विकासाचे जे स्वप्न भाजपने दाखविले होते ते 2019 च्या निवडणुकांत मतदारांना भुरळ पाडण्यास पुरेसे नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजप नेतृत्वाने दिली आहे असे म्हटले पाहिजे. चलनबदलाच्या किंवा जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचा जेवढा बोभाटा सरकार आणि भाजपने केला त्या पार्श्‍वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा भाजपला महत्त्वाचा वाटू लागावा? भाजपचे पूर्वापार तीन खास मुद्दे होते: राम मंदिर, 370 वे कलम आणि समान नागरी कायदा. विरोधी पक्ष असताना भाजपने राम मंदिरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनात भाग घेतला होता. किंबहुना त्या आंदोलनानेच भाजपची वेगवान वाटचाल सुरू झाली. तरीही स्वबळावर बहुमत भाजपला हुलकावणी देत राहिले (तीच भाजपची यापैकी कोणतेही आश्‍वासन पूर्ण न करता येण्याविषयीची सबबही होती.) परंतु 2014 मध्ये भाजपला केंद्रात स्वबळावर पूर्ण बहुमताची सत्ता मिळालीच (शत-प्रतिशत भाजपा); शिवाय देशभर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता मिळाली.

मतदारांनी भाजपवर दाखविलेला हा विश्‍वास भाजपच्या खास मुद्यांसाठी किती होता आणि भाजपने विकासाचे जे स्वप्न दाखविले त्यासाठी किती होता, हे तपासले पाहिजे. परंतु गेल्या साडेचार वर्षांत भाजपला आपल्या तीन खास मुद्यांपैकी एकाही मुद्याची आठवण आली नाही. आता लोकसभा निवडणुका जवळ येत असताना भाजपने राम मंदिराचा मुद्दा पेटविता ठेवण्याचा निर्धार केला आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या असे केल्याचे जाहीर केले आणि अयोध्येत 100 मीटर उंचीचा रामाचा पुतळा उभारण्याचे घोषित केले. त्यावरून भाजपचे मनसुबे स्पष्ट होतात. विरोधी पक्षात असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आणि सत्तेत असताना न्यायालयीन निर्णयावर भिस्त ठेवायची असेच भाजपचे राम मंदिराविषयीचे धोरण राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील राम मंदिरासाठी कायदा करण्याची केलेली मागणी हास्यास्पद ठरते; कारण 1990 च्या दशकात राम मंदिरासाठी संघ परिवार हिरीरीने आंदोलन करीत होता.

वास्तविक संघाने अशी मागणी करण्यापेक्षा भाजपला जाब विचारला असता तर संघ समर्थकांना निदान समाधान वाटले असते. पण तीही संधी संघाने गमावली. तरीही राम मंदिराचा मुद्दा भाजप आणि संघ परिवाराने अचानक लावून धरण्याचे कारण म्हणजे शिवसेनेने त्यात घेतलेली उडी! हा मुद्दा आपल्या हातून निसटेल ही वाटलेली धास्ती!
वास्तविक 1992 मध्ये बाबरी ढाचा कारसेवकांनी पाडला तेंव्हा “हे संघ अनुशासनाच्या विरूद्ध आहे,’ असे सांगत संघ आणि भाजप धुरिणांनी हात झटकले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र “शिवसैनिकांनी हे कृत्य केले असेल, तर मला त्याचा अभिमान आहे,’ अशी जाहीर भूमिका घेतली होती. ती कितपत योग्य होती हा प्रश्‍न अलहिदा; पण भाजपने आणि संघ परिवाराने जबाबदारी झटकली तेंव्हाच खरे तर हा मुद्दा त्यांच्या हातातून निसटला होता.

आता 25 नोव्हेंबर रोजी “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जातील,’ अशी घोषणा झाल्यानंतर संघ परिवाराला अचानक जाग आली आणि परिवाराने त्याच दिवशी “जनाग्रह मिरवणूक’ काढायचे जाहीर केले. वस्तुतः महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना हे मित्र पक्ष आहेत आणि शिवसेना नेहेमीच सत्तेत राहून विरोधक असल्याची वर्तणूक करीत असली तरी एकीकडे अयोध्येत ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्याने भाजप किंवा संघ परिवाराकडून राम मंदिराचा मुद्दा “हायजॅक’ होत नाही, असे उसने अवसान आणायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच दिवशी “जनाग्रह मिरवणूक’ काढून हजारो साधू-संतांना सामील होण्याचे आवाहन करायचे हा विरोधाभास झाला. अयोध्येसह नागपूर आणि बेंगलूरू येथे या मिरवणुका निघतील. जर “जनाग्रह मिरवणुका’ काढायच्या तर सरकारकडे राम मंदिरासाठी कायदा करण्याच्या मागणीला फारसा अर्थ उरत नाही, किंवा भाजप सरकारकडून संघ परिवाराला तशी अपेक्षाच नसल्याचे ध्वनित होते. तेंव्हा एक प्रकारचे गोंधळल्याचे चित्र यातून निर्माण होत आहे.

शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला तर हिंदुत्ववाद्यांचा आपल्या विषयी भ्रमनिरास होईल ही भीती भाजप आणि संघ परिवाराला वाटत असल्यास आश्‍चर्य नाही. तेंव्हा “जनाग्रह मिरवणूक’ नेमकी 25 नोव्हेंबरलाच काढणे, हा योगायोग नाही. शिवसेनेला देखील राम मंदिरापेक्षा भाजपवर हिंदुत्वाच्या बाबतीत कुरघोडी करण्यात स्वारस्य असल्यास त्याविषयी देखील अचंबा वाटण्याचे कारण नाही. एकूण राम मंदिराच्या मुद्‌द्‌याचे भिजत घोंगडे तसेच ठेवून मतदारांच्या दृष्टीत “आपण काहीसे अधिक हिंदुत्ववादी आहोत,’ हे सिद्ध करण्याच्या स्पर्धेचा हा भाग आहे. एरवी निवडणूक जवळ आल्यावर शिवसेना आणि भाजप यांना राम मंदिराची आठवण येण्याचे कारण नव्हते. शिवाय एकाच दिवशी एकाच विषयावर पण स्वतंत्रपणे शक्तीप्रदर्शन करण्याचेदेखील प्रयोजन नव्हते. तेंव्हा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखण्यात येणारी ही रणनीती आहे हे लपून राहिलेले नाही.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकास, “अच्छे दिन’ हे शब्द ऐकू येत होते. त्यांची जागा आता पाचच वर्षांत राम मंदिराने घ्यावी हा विकासाचे स्वप्न पोकळ ठरल्याचे निदर्शक मानले पाहिजे. “गुजरात मॉडेल’ शब्द भाजपच्या शब्दकोशातून गायब झाला आणि आता विकास आणि “अच्छे दिन’ हे शब्ददेखील! भाजपच्या शब्दकोशातील परवलीचे शब्द गायब होत असल्याने भाजपची भाषा देखील बदलली आहे. संघ परिवाराला रामाची पुन्हा आठवण झाली आहे. संघ परिवार आणि भाजप राम मंदिराच्या उभारणीसाठी काय करतो हे दिसेलच; की यांचा मर्यादित हेतू शिवसेनेवर केवळ कुरघोडी करणे एवढाच आहे, याचाही साक्षात्कार मतदारांना झाल्याखेरीज राहणार नाही !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)