ग्रामीण रुग्णालय रामभरोसे 

जामखेड – येथील जामखेड ग्रामीण रुग्णालयाची स्थिती असून अडचण आणि नसून खोळंबा असल्याचे प्रकार होत आहेत. रुग्णालयात कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी येत्या आठ दिवसात रुग्णालयाचा कारभार न सुधारल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे याना निवेदनाव्दारे दिला आहे.

निवेनात म्हटले आहे की, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची अधिक प्रमाणावर गैरसोय होते. त्यामुळे तत्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा, रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी यांचे कामावर येण्या-जाण्याचे वेळापत्रक बंधनकारक करावे, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी, केस पेपरवरील गोळ्या-औषधे रुग्णालयातीलच देण्यात यावे रुग्णाला बाहेरून औषध आणण्याचे प्रकार रुग्णालयात होतात.

प्रसूतिगृह स्वच्छ करण्यात यावेत, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड, आयडी कार्ड बंधनकारक करावे, रुग्णालयातील आवारातील खाजगी वाहनांची पार्किंग बंद करण्यात यावी. केंद्र शासनाच्या विविध योजनेचे फलक रुग्णालयात लावण्यात यावेत, तसेच रुग्णालयाच्या आवारात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाय योजना करावी, आदी सर्व मागण्या तत्काळ अंमलात आणाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष वैभव जामकावळे, दादासाहेब सरनोबत, प्रदीप टापरे, पप्पू काशीद, सनी सदाफुले, बालाजी भोसले, गणेश पवार, आलेश जगदाळे, हृषिकेश डूचे, दत्ता सरनोबत, बाला साठे, भाऊ आमटे, गणेश हगवणे, सोनू कदम, दादा गाडे, महेंद्र आदे, नितीन जाधव, मनोज कार्ले आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)