“स्पीड पोस्ट’द्वारे राखी पाठविण्याला प्राधान्य :अडीचशे रुपयांपर्यंतच्या राख्या

संगमनेर – भावा-बहिणीच्या अतूट नात्याची जाण करून देणारा व युगानुयुगे चालत असलेल्या या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे संगमनेर शहरात बाजारपेठेत लहान-मोठ्या व्यावसायिकांनी वैविध्यपूर्ण राख्यांनी दुकाने थाटली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रक्षाबंधनामुळे दैनंदिन केल्या जाणाऱ्या स्पीड पोस्टाचे प्रमाण काहीसे वाढले आहे.

रविवारी रक्षाबंधन सण आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात विविध आकार व प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. महिला व तरुणींची राख्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीला आकर्षित करणाऱ्या यंदा खास राख्याही बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.

अवघ्या 1 रुपया पासून 250 रुपयापर्यंतच्या आकर्षण राख्या बाजारात सध्या उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वापार चालत आलेल्या या सणाचे महत्त्व आजही तेव्हढेच असल्याचे यामुळे अधोरेखित होत आहे. अवघ्या तीन दिवसावर रक्षाबंधनाचा सण अल्याने बाहेरगावी असणाऱ्या आपल्या भावाला राखी पाठविण्यासाठी संगमनेर पोस्ट ऑफिसमध्ये “सेम डे’ अर्थात स्पीड पोस्ट करण्यासाठी महिला व तरुणींची गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.

छोटा भीम, डोरोमॅनचाही प्रभाव…

स्नेहबंधनाचा धागा विविध आकर्षक रूपांनी राख्यांवर साकारला आहे. बच्चे कंपनीसाठी ऐटदार अशा कार्टून कॅरेक्‍टर छोटा भीम, डोरेमॅन, स्पायडरमॅन, मिकी माऊस, बॉबी, टॉम ऍण्ड जेरी, अंग्री बर्ड, बालगणेश, कृष्ण याचबरोबर विविध सिनेमांची लेबल असलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. गोंडा, कुंदन, खड्यांच्या, रुद्राक्ष, रत्न, सोने, चांदीचे वर्ख दिलेल्या विविध प्रकार व रंगीबेरंगी राख्यांनी संगमनेरची बाजारपेठ सजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)