बालेकिल्ल्यात रामअस्त्र ठरू शकते प्रभावी

पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यात वाढविला जनसंपर्क : सर्वपक्षीय मैत्री जमेची बाजू

– सम्राट गायकवाड

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघात आता खा.शरद पवार व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यापाठोपाठ विधानपरिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर यांचे नाव देखील पुढे आले आहे. पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यात वाढविलेला जनसंपर्क अन सर्वपक्षीय असलेली मैत्री या जमेच्या बाजू असून त्या जोरावर पवार आपल्या भात्यातून रामअस्त्र बाहेर काढण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

ना.रामराजे ना.निंबाळकर यांच्या राजकीय कारर्कीदीची सुरूवात पवारांच्या मागदर्शनाखाली सुरू झाली. सन 1992 च्या नगरपालिका निवडणूकीनंतर 1995 च्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ना.रामराजे फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभे राहिले. तेव्हा पवार यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे ना.रामराजेंचा दणदणीत विजय झाला.

त्याचबरोबर तत्कालिन युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय देखील पवारांच्या सूचनेनुसारच घेण्यात आला.
तेव्हापासून ते आजपर्यंत रामराजेंच्या नावापुढे कायम नामदार उपाधी राहण्यासाठी पवार कायम आग्रही राहिले. आघाडी सरकारच्या कालावधीत सातारा जिल्ह्याचे सर्वाधिक काळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी ना.रामराजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंकेसह इतर संस्थांच्या निवडणूकांमध्ये ना.रामराजेंची भूमिका कायम निर्णायक राहिली. परिणामी अद्याप सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहण्यामागे ना.रामराजेंचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.

दरम्यान,2014 मध्ये राज्यात सत्तांतर होवून युतीचे सरकार आले. मात्र, विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे सदस्य संख्याबळ असल्याने साहजिकच सभापतीपदी नियुक्ती करण्याची वेळ आली तेव्हा ना.पवार यांनी रामराजे यांच्या नावाला प्राधान्य दिले. आता येत्या सहा महिन्यानंतर सभापतीपदाचा कालावधी संपणार आहे. तर दुसऱ्या बाजूला फलटण विधानसभा मतदारसंघावरील आरक्षण कायम राहणार आहे. त्यामुळे आता ना.रामराजेंना दिल्लीच्या राजकारणात जाण्याशिवाय तुर्त दुसरा पर्याय उरलेला नाही. अशावेळी साहजिकच ना.रामराजेंनी माढ्यातून लढावे असा आग्रह फलटण तालुक्‍यातून होत आहे. मात्र, फलटण वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला म्हणावा असा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही.

अशावेळी सातारा लोकसभा मतदारसंघ ना.रामराजे यांच्यापुढे सातारा लोकसभेचा पर्याय आहे. साहजिकच त्यामागे त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून विशेषत: धोम बलकवडी व इतर प्रकल्पांची केलेली कामे आणि पालकमंत्रीपदाच्या माध्यतूान सतत दहावर्ष जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात केलेले दौरे व त्या निमित्ताने निर्माण केलेला जनसपंर्क ही त्यांची बलस्थाने आहेत. त्या बलस्थानांच्या जोरावर ना.रामराजेंना उमेदवारी देण्याची घोषणा केली तर निवडून येताना फार अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पवार ऐनवेळी आपल्या भात्यातून रामअस्त्र बाहेर काढतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

सर्जिकल स्ट्राईक ही राजकीय शैली

वकील, प्रोफेसर, क्रिकेटर आणि तदनंतर राजकारणात आलेले ना.रामराजेंची राजकीय शैली कायम सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे राहिली आहे. कोणतीही निवडणूक कितीही संघर्षाची असो. ती जिंकण्यासाठी अवगत ज्ञानाचा पुरेपुर वापर करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर निवडणुकीत प्रचार अन संघर्ष नेमका कोठे करायचा आणि निवडणुकीतील चुरस कशी कमी करायची, हे कौशल्य आगामी निवडणुकीत पाहण्यास मिळण्याची शक्‍यता आहे.

फलटण पुर्वीच्या सातारा मतदारसंघात

1999 पर्यंत फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश सातारा लोकसभा मतदारसंघात होता. त्याचबरोबर सन.1996 च्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून हिंदूराव ना.निंबाळकर हे निवडून आले होते. मात्र, 1999 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली व फलटणचा समावेश माढा मतदारसंघात करण्यात आला. त्यानंतर देखील आजपर्यंत ना.रामराजेंचा राजकीय केंद्रबिदू साताराच राहिला आहे. त्यामुळे रामराजे यांना उमेदवारी देताना दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवार देण्यात आला, ही बाब गैरलागू ठरणार आहे.

ते दिल्लीला जावे, ही आमदारांची इच्छा

ना.रामराजेंचे जिल्ह्यातील सर्वच आमदारांशी कायम मैत्रीपुर्ण स्नेह राहिला आहे. आजपर्यंतच्या राजकारणात त्यांच्यात अन आमदारांच्यात थोडा देखील विसंवाद निर्माण झाल्याची एक ही घटना घडली नाही. त्यामुळे ना.रामराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर सर्व आमदार मन लावून काम करणार हे नक्की. त्यापैकी विशेष बाब म्हणजे, येत्या काळात राज्यात पुन्हा आघाडी सरकार आले तर पुन्हा एकदा जिल्ह्यातील मंत्रीपदासाठी ज्येष्ठ म्हणून ना.रामराजेंचा विचार होणार आहे. परिणामी मंत्रीपदासाठी वेटिंग असलेल्या आमदारांना आणखी वेटिंग करावी लागेल. त्यामुळे आता रामराजेंनी दिल्लीला जावे अशी देखील आमदारांची इच्छा असल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)