‘त्यांच्या’ रांगेत लवकरच प्रियंका गांधी- डॉ. सुब्रमण्यम स्वामी

आकुर्डी :भाजप दक्षिण भारतीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी – कॉंग्रेसचे दिग्गज नेते जामिनावर बाहेर आहेत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, शशी थरूर, मोतीलाल व्होरा, सॅम पित्रोडा हे सर्व दिग्गज नेते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या रांगेत लवकरच प्रियांका गांधी बसतील, अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

भाजप दक्षिण भारतीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. भाजप दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला महापौर राहुल जाधव, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर आदी उपस्थित होते.

राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, कॉंग्रेसने 70 वर्षे केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. देशाला पूर्ववत पदावर आणण्यासाठी आताची पाच वर्षे पुरेसे नाहीत. यासाठी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना डॉ. स्वामी म्हणाले की, देशाच्या इतिहासात मोदींच्या काळात प्रथमच सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानवर हल्ला केला. यावर राहुल गांधी पुरावे मागत आहे. अमेरिकेने लादेनला मारले. तेव्हा राहुल गांधी यांनी अमेरिकेला पुरावे का मागितले नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

राजेश पिल्ले म्हणाले, बैठकीला भाजप दक्षिण आघाडीचे राज्यातील 32 जिल्ह्याचे अध्यक्ष व तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पॉण्डेचेरी या 6 राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)