प्रदेशाध्यक्षांची मंत्र्यांना भोसकायचीही तयारी
जाहीर सभेत स्वाभीमानीची मुक्ताफळे
अकोला: शेतकऱ्यांना आणि जनतेला खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना कपडे काढून मारले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा गावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, राज्यभरातील गावागावात जाऊन भाषणे ठोकणाऱ्या, मिरवणाऱ्या आणि खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना ठोकले पाहिजे. ते अनेक आश्वासने देवून जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवितात. मात्र, सत्ता येताच सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांचा भ्रमनिरास करतात. अशी खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना नुसते ठोकले नव्हे, तर कपडे फाडून तुडवले पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापूरमधून माणसे पाठवेन याची वाट पाहू नका. तुम्हालाच त्यांना धडा शिकवायला हवा. सरकारला आपले देणे लागते. आम्ही बॅंकेचे देणे देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्यांना ठोकले तर बिघडले कुठ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अकोल्यात दोन-तीन मंत्र्यांना कपडे काढून मारा. पोलीसही तुम्हाला काही करणार नाहीत. तेही या सरकारला त्रासले आहेत, असे राजू शेट्टी जाहीर सभेत म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले. राजू शेट्टी यांनी आदेश दिल्यास मंत्र्यांना भोसकायलाही कमी करणार नसल्याचे तुपकर म्हणाले.
यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या एखाद्या मंत्र्यांना पेटवा. आमदाराला, खासदाराला ठोका पण आत्महत्या करू नका, असे टोकाचे वक्तव्य तुपकर यांनी केले. तसेच कापूस, सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी येत्या 19 तारखेनंतर आंदोलनाचा इशाराही तुपकर यांनी यावेळी दिला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0