अन्यथा कारखानदारांचे गुडघे टेकविणार

खा. राजू शेट्टी : राफेल पेक्षा पीक विमा योजनेचा घोटाळा मोठा

पालकमंत्री चमकोगिरीत व्यस्त

जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पालकमंत्री राम शिंदे निवडणूकीच्या तयारीसाठी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. स्वत:च्या राजकीय सोईसाठी पालकमंत्री चमकोगिरी करण्यात व्यस्त आहेत. पालकमंत्री शिंदेंना शेतकऱ्यांचे काहीएक देणे घेणे नाही. अशी टिका सर्वच नेत्यांनी यावेळी केली.

जामखेड – पंतप्रधान पीक विमा योजनेतील घोटाळा हा राफेल घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे.भाजप सरकारकडून विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचे धंदा सुरू केला आहे. सरकारने फक्‍त दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र उपाययोजना शुन्य आहेत.

नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जर शेतकऱ्यांचा मागील वर्षीचा हिशोब आठ दिवसांत पूर्ण केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक आंदोलन छेडून कारखानदारांना गुडघे टेकावयाला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

भाजपला गाडण्याचे काम करा

खर्डा गावाला मोठा इतिहास आहे. निजामाचे राज्य गाडण्याचे काम खर्डा ग्रामस्थांनी केले.आता भाजपला गाडण्याचे काम खर्डा ग्रामस्थांनी करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले.

जामखेड तालुक्‍यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खर्डा येथे रविवार आयोजित केलेल्या दुष्काळी परिषदेत खा. शेट्टी बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, संतोष पवार, ऋषिकेश डुचे, माणिक कदम, पुजाताई मोरे, शर्मिला येवले, मंगेश आजबे, रमेश आजबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले, भाजप सरकार शेतकरी व कारखानदारांचे भांडणे लावण्याचे काम करत आहेत. राज्यातील 43 कारखानदारांनी स्वाभिमानीच्या म्हणण्यानुसार भाव दिला आहे. सरकारने जाहीर केलेला दुष्काळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमुळे केलेला आहे. सरकारने फक्‍त दुष्काळ जाहीर केला, पण दुष्काळी परिसरातील विद्यार्थींची फी माफ करावी लागते, वीजबील माफ करावे लागते ही सरकारची जबाबदारी आहे.

सरकारने दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू न करता शेतकऱ्यांच्या दावणीला थेट चारा उपलब्ध करून द्यावा. हेक्‍टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी केली. दुष्काळाची झळ फक्‍त शेतकऱ्यांनाच बसते. दुष्काळ जाहीर केला मात्र अंमलबजावणी केली नाही. जर सरकारने अंमलबजावणी केली नाही तर मंत्र्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही.
तुपकर म्हणाले की, तालुक्‍याचा बिहार झाला आहे. भाजप नेते भांडणे मिटविण्याऐवजी भांडणे लावण्याचे काम करत आहेत.

परिसरात प्रचंड दुष्काळ असताना मंत्री दुष्काळी दौरे काढत आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. तेवढा पैसा जर शेतकऱ्यांसाठी खर्च केला तर अनेकांचे संसार उभे राहतील. राज्यात प्रचंड दुष्काळ असताना शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतू चर्चा मात्र अवनीच्या मृत्यूची, राखी सावंत व तनुश्री दत्तावर होत आहे. भाजप शिवरायाचे नाव घेवून सत्तेवर आले. शिवरायांच्या काळात एकही आत्महत्या झाली नव्हती. भाजपच्या काळात आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गावगाडा सुरळीत चालण्यासाठी भाजपला गाडण्याचे आवाहन तुपकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)