राजेंद्र गायकवाडला 7 दिवसांची पोलीस कोठडी

किरण गायकवाड खूनप्रकरण : आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न

कोरेगाव – बिचुकले, ता. कोरेगाव येथील किरण संजय गायकवाड याचा खून अनैतिक संबंधांवरुनच झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. राजेंद्र गायकवाड याच्यासमवेत आणखी एकाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यादृष्टीने तपास केला जात आहे. दरम्यान राजेंद्र गायकवाड याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली
आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण गायकवाड याचे नातेवाईक महिलेसमवेत अनैतिक संबंध असल्याचा राजेंद्र याला संशय होता. त्यामुळे तो किरण याच्यावर चिडून होता. गुरुवारी सकाळी त्याने साथीदारासह एकसळ येथे येऊन किरण याला बिचुकले गावाकडे पार्टी करण्यासाठी नेले. दोघांजवळ कोयता होता. पळशी-बिचुकले रस्त्यावर निर्जन ठिकाणी ते थांबले. त्यांनी किरण याच्याकडे विचारणा केल्यावर उडवाउडवीची उतरे दिली. त्यामुळे संतापलेल्या राजेंद्र याने कोयत्याने किरण याच्यावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात किरण जागीच मृत्युमुखी पडला.

या हल्ल्यानंतर राजेंद्र हा वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. त्याने अनैतिक संबंधाच्या कारणातून किरण याचा खून केल्याचे सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुहास गरुड, निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा व सपोनि संतोष साळुंखे यांनी कसून चौकशी केल्यावर एवढेच कारण असल्याचे त्याने सांगितले. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता, 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सपोनि संतोष साळुंखे तपास करत आहेत.

भाऊ गावात; सहभागाबाबत अनिश्‍चितता

राजेंद्र याने किरण याचा खून गुरुवारी केला. त्याचदिवशी त्याचा भाऊ हा पुण्यावरुन बिचुकले येथे आला होता. त्याचा या खुनात सहभाग आहे किंवा काय, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर आणखी कोणी नातेवाईक सहभागी आहेत काय याची पडताळणी केली जात आहे. मात्र, त्यांच्या सहभागाबाबत अजून अनिश्‍चितता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)