उल्लेखनीय: राजेसाहेब सत्त्वशीलादेवी भोंसले

नम्रता देसाई

लोककलांच्या संवर्धनासाठी झटलेल्या शतराणी म्हणजे राजेसाहेब सत्त्वशीलादेवी भोंसले होय. 18 जुलै 2018 रोजी प्राणज्योत मालवली असली तरी “राजेसाहेब’ या नावाने अदबीने सर्व कोंकणवासी ज्यांना पुकारत त्या ह. हा. सत्त्वशीलादेवी शिवरामराजे सावंत भोंसले म्हणजे सावंतवाडी संस्थानच्या लोककलांचे संवर्धन करणारे महत्त्वाचे नाव.
राजेसाहेब असे अदबीने म्हणण्यामागे विशेष कारण आहे. कारण ह. हा. ले. क. राजाबहाद्दूर शिवरामराजे सावंत भोंसले यांच्या जाण्यानंतर संस्थानाचे वैभव जपत राणींनी परंपरा आणि आधुनिकता यांचा उत्तम मेळ घालत सावंतवाडी शहराच्या पर्यटन नकाशावर विविध लोककलांना ठळक स्थान प्राप्त करून दिले.

खरं तर त्या संस्थानात लग्न करून आल्या त्यानंतर विविध गावांमध्ये असणाऱ्या जुन्या घराण्यांना भेटी देऊन कोंकण समजून घेत त्यांनी सांस्कृतिक बदल जाणून घेतला. या घराण्यांना भेटी देत असतानाच्या आठवणी आजही जुने जाणते मोठ्या कौतुकाने सांगतात. राजेसाहेब सत्त्वशीलादेवी भोंसले यांनी सुरुवातीला गावगाडा समजून घेत इथली कलासंस्कृती आणि त्याचे महत्त्व जाणले. भविष्यात पर्यटन विकास होईल, हे लक्षात घेऊन सावंतवाडीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी लाखकाम केलेल्या वस्तू तसेच गंजिफा यांचे जतन आणि विक्री सुरू केली. या माध्यमातून स्थानिक कलाकारांना रोजगार संधी उपलब्ध झाली. तसेच हस्तोद्योगांना चालना मिळाली.

बडोदा घराण्यातील सरलाराजे आणि सुंदरवाडी संस्थानचे राज्याभिषेक झालेले राजे बापूसाहेब महाराज यांचा विवाह 8 मे, 1951 रोजी पुणे शहरात झाला. विवाहानंतर 11 डिसेंबर रोजी दोघेही सावंतवाडी राजवाड्यात वास्तव्यास आले.
शिवप्रियादेवी आणि युवराज खेमसावंत असे दोघेही संस्थानावर प्रेम असणारी पुढील पिढी कलासंस्कृती संवर्धन कार्यात सहभागी असतात. राजेसाहेब सत्त्वशीलादेवी यांनी धनगरी नृत्य, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, लाखकाम केलेल्या वस्तू आणि गंजिफा खेळ तसेच पारंपरिक पट कौड्यांचा खेळ अशा अनेक गोष्टींचा मोठा संग्रह केला. विविध काळात आलेल्या पाहुण्यांसाठी या कलांचे प्रदर्शन खुले करून स्वतः माहिती त्या देत असत.

नव्वदीत असलेल्या पुंडलिक चितारी यांच्या सहकार्याने गंजिफांवर करण्यात येणारी कलाकुसर शिकून घेऊन राणी सत्त्वशीलादेवी यांनी या कलेच्या कार्यशाळा खुल्या स्वरूपात घेण्यास सुरुवात केली. हे सर्व काम सावंतवाडी लॅकरवेअर्स’ या राजेबहाद्दूर बापूसाहेब महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होते. त्याची धुरा राजेंनंतर सत्त्वशीलादेवी यांनी सांभाळली. राजेसाहेब सत्त्वशीलादेवी भोंसले यांचे योगदान भारताचा पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गच्या दृष्टीने विशेष आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)