विविधा: राजा गोसावी

माधव विद्वांस

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा राजा अर्थातच “राजा गोसावी’ यांची आज जयंती. त्यांचा जन्म 28 मार्च 1928 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली हे त्यांचे गाव. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत सामान्य होती. उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील काही दिवस कुटुंबासह पंढरपूर येथेही जाऊन राहिले होते. राजा गोसावी यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए. (बॉर्न आर्टिस्ट) होते. लहानपणापासून त्यांना नाटक सिनेमाचा नाद असल्याने ते मुंबई येथे पळून गेले व मास्टर विनायकांच्या घरी त्यांनी घरगड्याचे काम पत्करले. त्यामुळे त्यांचा चित्रपटसृष्टीतील लोकांचा संबंध आला व प्रफुल्ल पिक्‍चर्समधे त्यांनी आधी ऑफिसबॉयचे काम मिळवले. सुतारकाम, मेकअप मॅन, प्रकाश योजना अशी कामे करता करता ते ‘एक्‍स्ट्रा’ नट बनले. ते भानुविलास चित्रपटगृहात बुकिंग खिडकीवर सिनेमाची तिकिटेही विकायचे.

त्याबरोबर ते दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ‘प्रॉम्प्टर’ म्हणून काम करू लागले व नाट्यसृष्टीशीही त्यांचा संबंध आला. ‘भावबंधन’ या नाटकात त्यांना रखवालदाराची भूमिका मिळाली, हीच त्यांची अभिनयाची सुरुवात होती. त्याचवेळी ते नाटकांची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत. ‘अखेर जमलं’ या चित्रपटापासून त्यांचा चित्रपट अभिनेते म्हणून श्रीगणेशा झाला. याच चित्रपटामध्ये शरद तळवलकर यांनीही काम केले होते. त्यांचाही हा पहिलाच चित्रपट होता. ‘अखेर जमलं’ हा चित्रपट भानुविलास चित्रपटगृहात लागला तेव्हाही त्यांनीच आपल्या चित्रपटाची तिकिटे विकली होती. चाळीत राहणाऱ्या चार टारगट तरुणांची समोर राहणाऱ्या पोरीला पटविण्यासाठी केलेल्या धडपडीची मजेशीर कथा होती.

आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 100 चित्रपट व 50 च्यावर नाटकांतून अभिनय केला. त्यांचा चेहरा खूप बोलका होता. त्यामुळे त्यांचा अभिनय नैसर्गिक असे. त्यांचा स्वभाव विनोदी व अत्यंत हजरजबाबी असल्याने त्यांची संवादफेक व विनोदातील आशय प्रेक्षकांना आवडायचा. बघता बघता त्यांच्या नावावरच नाटकं आणि सिनेमा या गोष्टी गर्दी खेचू लागल्या. निर्माते बाबुराव गोखले यांनी राजा गोसावींना तिहेरी भूमिकेत दाखवत ‘राजा गोसावीची गोष्ट’ हा चित्रपट काढला होता. त्यांची भूमिका ही शहरी मध्यमवर्गीय नायकाची असल्याने ती लोकांना खूप आवडली होती. ते त्यावेळी खरे हिरो ठरले होते. दादा कोंडके म्हणत की, लोकांना हसविण्यासाठी आम्हाला अंगविक्षेप करावे लागत; पण राजा गोसावींनी अभिनयातून लोकांना हसविले.

रंगभूमीवर सौजन्याची ऐशी तैशी, लग्नाची बेडी, प्रेम संन्यास, एकच प्याला, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटके. रूपेरी पडद्यावर याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वाशेर, हा खेळ सावल्यांचा इत्यादी चित्रपटही प्रेक्षकांना भावले. अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे वर्ष 1995 मधे ते अध्यक्ष झाले होते. नाट्यपरिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. 1 मार्च 1998 रोजी पुणे येथे राजा गोसावी यांना नाट्यगृहात मेकअप रूममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला व खऱ्या अर्थाने ते नाटक व अभिनय आयुष्याच्या अखेरपर्यंत जगले असेच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)