राज ठाकरेंच्या भाषणांची होणार तपासणी

मुंबई – लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले नसले तरी भाजप विरोधात उघडपणे मैदानात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यभरातल्या सभेतील भाषणांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तपासणी होणार आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाचा अप्रत्यक्षपणे कोणत्या उमेदवाराला फायदा होतो याची तपासणी केली जाणार असून त्यानंतर निवडणूक अधिकारी याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात धरायचा अशी विचारणा भाजपाने निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. त्यावर राज ठाकरेंची सर्व भाषणे निवडणूक अधिकारी तपासणार असल्याचे भाजपाला सांगण्यात आल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पाया खालची जमीन सध्या सरकली आहे. त्यामुळे ते आता सरकार आणि कॉंग्रेसमधील त्यांचे सहकारी त्यांना चक्रव्यूहात अडकवून संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे नांदेडमध्ये सांगत फिरत आहेत. मतदारांना भावनिक आवाहन करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असला तरी नांदेडकर मतदार आता त्यांना भुलणार नाहीत, असेही विनोद तावडे म्हणाले.

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्याबद्‌दल काही वक्‍तव्य करणे योग्य नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नसल्याचेही तावडे म्हणाले.


उर्मिलाजी यांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचे काय
अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करून उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आज बोरिवलीत जो प्रकार घडला त्यात कोणते अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य होते? दहा दिवसांतच उर्मिलाजींना अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा विसर पडला काय, असा सवाल विनोद तावडे यांनी केला.जे प्रवासी उस्फुर्तपणे मोदी-मोदी अशा घोषणा देत होते त्यांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेतही मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यांनी ते स्वीकार केले. मग उर्मिलाजींच्या कार्यकर्त्यांना ते का सहन करता आले नाही? कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या एका महिलेला देखील मारहाण केली. हे उर्मिलाजींना चालते काय असा सवालही त्यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)