नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसला तरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा सुरु आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या सिमेवर सिंहगड रस्त्यावरील खडकवासला कालव्याच्या बाजूच्या शिंदे मैदानात ही सभा होत आहे. “काल नरेंद्र मोदींनी माढ्यात कहर केला,त्यां नी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेंव्हा तुम्ही गप्प का होता. मोदींच्या गुजरात मध्ये, उना मध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेंव्हा ते गप्प का होते?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात नांदेड, सोलापूर, इचलरंजी, साताऱ्यात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यांनी पूर्वीच्या आपल्या चारही सभांमध्ये केंद्रशासन तसेच राज्यशासनाच्या कारभाराची चिरफाड केली आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

 • खडकवासला भागातून येताना जाताना माझ्या रमेश वांजळेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते.
 • पूर्वी पुणे, मुंबई ही शहरं खूपच सुंदर होती, पण प्रगतीच्या नावाखाली ती विस्कटत जातात. हे जगभरात होतं फक्त ती शहरं प्रगती करून देखील टुमदार होतात. आपली शहरं मात्र बकाल होत जातात.
 • आपली शहरं नुसती वाढत जात आहेत, त्याला आकार उरला नाही. वाढत्या शहरांमध्ये पुरेसं पार्किंग नाही, कॉलेजेस नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत
 • ही शहरं छान राहावीत म्हणून धोरण आखायचं असतं आणि हे धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी असतात त्यांना निवडणून देण्यासाठी ही निवडणूक आहे.
 • ५ वर्षांपूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदींनी अनेक स्वप्न दाखवली, पण आज ५ वर्षानंतर निवडणुकांच्या तोंडावर मोदी त्या स्वप्नांनवर बोलायला तयार नाहीत. त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायाचा नाही. त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मतं मागायची आहेत
 • काल त्यांनी माढ्यात कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले, मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेंव्हा तुम्ही गप्प का होता. मोदींच्या गुजरात मध्ये, उना मध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेंव्हा ते गप्प का होते?
 • उना मध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग माझे अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्ट मध्ये आहेत असं तुम्हीच सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय?
 • जर बीफ निर्यात करणारे तुमचे मित्र असू शकतात तर मग गो-हत्येच्या नावावर ५०, ६० लोकं मारले गेले तेंव्हा तुम्ही का गप्प बसलात?
 • बलात्कार हा बलात्कार असतो,अशा घटनांचं राजकारण करायचं नसतं,असं मोदी सत्तेत आल्यावर म्हणाले. मग सत्तेत येण्याच्या आधी निर्भयाच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, अशा घटनांचं राजकरण करून तुम्ही का मतं मागत होतात? २०१२ साली बलात्काराच्या घटना २४९२२ होत्या तर २०१६ ला हा आकडा ३८८११ आहे.
 • तुम्ही काहीतरी वेगळं करणार म्हणून तुम्हाला सत्ता दिली, पण तुम्ही सत्तेत आल्यावर आधी पेक्षा देश रसातळाला गेला. देश पाण्यासाठी तडफडतोय, तरुणांना नोकऱ्या हव्यात आणि अशा वेळेला तुम्ही पुतळ्यांवर ४००० कोटी खर्च करत होतात. ह्या देशाला खरंच पुतळ्यांची गरज आहे का?
 • डोकलामच्या वेळेला असं वातावरण निर्माण केलं की कधीही युद्ध होईल, मग चीनवर,चीनच्या वस्तूंवर बंदी आणा, मग एवढं होतं तर मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनवून आणला?
 • सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगतात, ह्या देशाची लोकशाही धोक्यात आहे हे सांगतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ह्या सरकारच्या दबावाला कंटाळून राजीनामे देऊन निघून गेले. असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नाही.
 • रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह मधले ३ लाख कोटी रुपये, तेंव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल ह्यांच्याकडे सरकारने पैसे मागितले. त्यांनी नकार दिला, शेवटी सरकारच्या दबावाला कंटाळून ते निघून गेले. पुढे मर्जीतला गव्हर्नर बसवून त्यांनी रिझर्व्ह बँकेला २७ ते २८ हजार कोटी रुपये द्यायला लावले.
 • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का? बरं ह्यावर मोदी म्हणाले होते की मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काय कामाची? बिझनेससाठी अहमदाबादलाच जावं लागतं. पुण्यात जायचं असेल तर फक्त शिक्षणासाठी. बरं तुमचं असं मत असेल तर मला सांगा गुजराती बांधवांना व्यापारासाठी महाराष्ट्रात का यावंसं वाटतंय?
 • जे जे राष्ट्राध्यक्ष आले त्यांचं त्यांचं स्वागत मोदींनी गुजरात मध्ये का केलं? त्यांना फक्त गुजरातमध्येच का नेता? देशातील इतर शहरात का नाही नेलं? मोदी तुम्ही एवढे जगभर फिरलात, काय साध्य केलं तुमच्या परदेश दौऱ्यानी? काय मिळालं देशाला?
 • स्वच्छ भारताच्या नावाखाली इतका कर गोळा केलात, कुठे आहे तो पैसा? खरंच भारत स्वच्छ झाला का? रामदेव बाबांच्या नादी लागून योगा दिवस साजरा केला? हे बाबा आहेत कुठे? त्यांचा व्यवसाय ५ वर्षात इतका कसा फोफावला?
 • जगातलं सगळ्यात आलिशान असं राजकीय पक्षाचं कार्यालय भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्तेत आल्यावर उभारलं, त्यासाठी पैसे कुठून आणले?
 • देशातील बँकांचा पैसा, जो तुमचा आमचा पैसा होता ते घेऊन विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी, निलेश पारेख, नितीन संदेरसा, चेतन संदेरसा, रितेश जैन, सभ्या सेठ विक्रम कोठारी हे देशाबाहेर पळून गेले, नरेंद्र मोदींच्या काळात निघून गेले.
 • मला कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचं नाहीये पण मोदींनीच ती वेळ आणली आहे. वर्षातून एकदा तुम्ही घरी आईला भेटायला जाणार आणि ते देखील मीडिया घेऊन? आज तुम्ही पंतप्रधान झालात, का नाही आईला स्वतःसोबत रहायला नेत. त्या माउलीचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला
 • नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. त्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना देखील दूर ठेवायला हवं. तुम्हीच आता सारासार विचार करून निर्णय घ्या
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)