मुुंबई – लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला उघडपणे पाठिंबा जाहिर करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवार, 12 एप्रिल रोजी नांदेडमध्ये जाहिर सभा होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीतील राज ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. गुढीपाडव्यादिवशी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तोफ डागत लोकसभा निवडणूकीत भाजपाविरोधात मतदान करा, अशी जाहिरपणे आवाहन केले होते. मेळाव्यात बोलताना भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यभरात 10 ते 11 ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांची पहिली सभा नांदेडमध्ये होत आहे. पहिल्या सभेसाठी राज यांनी भाजप उमेदवार निवडणूक लढवत असलेला मतदारसंघ निवडला आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील राज यांची ही पहिलीच सभा आहे.
12 एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदान, कृषी मार्वेैटसमोर येथे सभा होईल. या सभेतून राज ठाकरे भाजपच्या विरोधात एल्गार पुकारतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदेडमध्ये कॉंग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यात मुख्य लढत आहे.