‘मोदी-शाह’ विरूध्द देश अशी 2019 लोकसभेची निवडणूक – राज ठाकरे

मुंबई – भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे, असं आवाहन आणि विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला.

वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या बारामतीचा पोपट या वक्तव्याचा खरपूस समाचार राज ठाकरेंकडून घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा असं त्यांनी यावेळी म्हटलं.

तसेच नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर ओढलेले ताशेरे ते पवारांवर उधळलेली स्तुतिसुमनं याबदल राज ठाकरेंकडून मोदींच्या भाषणाच्या चित्रफीती सादर करण्यात आल्या.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

-लोकसभेचा पक्षाचा निर्णय जाहीर केला आहेच, पण मी आज महाराष्ट्र सैनिकांशी सविस्तर बोलायला आलो आहे.

-गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही पण तरीही मनसे एक सीट दोन सीट लढवणार असे तर्क लढवायला माध्यमांनीच सुरुवात केली. पण माझा पाडवा मेळावा आठवा, मी म्हणालो होतो देशातील सर्व पक्षांनी मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात एकत्र यायला हवं

-मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात देशातील नेत्यांनी/पक्षांनी एकत्र यायला हवं हे बोलणारा मी पहिला नेता होतो, मग मला डर का असेल?

-मी अजित पवारांना आणि अशोक चव्हाणांना बोललो की मी तुम्हाला कधी सीट्स मागितल्या, कधी युतीची चर्चा केली? ह्यावर ते म्हणाले नाही. मग मी विचारलं मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात?

-माझ्यासाठी पक्ष आत्ता पक्ष महत्वाचा नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे? त्यासाठी पक्ष, नेते हे महत्वाचे नेते नाहीत. मी ह्या पुढे ज्या सभा घेणार आहे तिकडे मी मोदी-शाहच्या विरोधात बोलत राहणार

-नरेंद्र मोदी हे कसलं चौकीदार कॅम्पेन करत बसलेत, जरा मोठा विचार करा, ह्यांच्याकडे काही दाखवण्यासारखं नाही म्हणून हे चौकीदार कॅम्पेन करत बसलेत

-भाजपकडून चौकीदारचं कॅम्पेन सुरु आहे, निवडणूक भारताची आहे की नेपाळची?

– भाजपची लोकं तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर घ्या, त्यांनी देश लुटलाय, तुम्ही त्यांना लुटलं तर हरकत नाही

-भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे

-सरकारने रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख कोटींची मागणी केली आणि ह्या मागणीला तेंव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल ह्यांनी विरोध केला म्हणून त्यांना जावं लागलं. म्हणजे भाजप सरकारकडे पैसे नव्हते आणि हे युद्ध करायला निघाले होते

-देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा

-रतन टाटा म्हणाले की गुजरात मध्ये उत्तम काम सुरु आहे, म्हणून मी तिकडे गेलो, आणि मला जे दाखवलं गेलं त्यावर मी बोललो होतो की महाराष्ट्र हा आज देखील एक नंबरचं राज्य आहे पण गुजरात मध्ये चांगलं काम सुरु आहे. मग मी २०१४ नंतर जे मी पाहिलं, जे बिघडलं म्हणून मी मोदींवर टीका सुरु केली

-चौकीदार हे नवीन ‘गिमिक’ आहे. तुम्ही प्रश्न विचारू नयेत म्हणून ही गिमिक आहेत. मी माझ्या आयुष्यात नरेंद्र मोदींइतका खोटा पंतप्रधान कधीच पाहिला नाही.

-मी ९ मार्चच्या भाषणात पुलवामाबद्दल प्रश्न विचारले आणि फडणवीस आणि भाजप नेते उत्तर देण्याऐवजी भलतंच बोलत बसले. का? कारण ह्यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरंच नाहीत.

–एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे, खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रचार

-पंडित नेहरूंना, इंदिरा गांधींना शिव्या द्या ह्या पलीकडे मोदींनी गेल्या ५ वर्षात काय केलं? जर मोदींच्या मते नेहरू इतके वाईट आणि त्यांची तुलना सारखी सरदार वल्लभभाई पटेल ह्यांच्याशी करताय, मग सरदारांचा पुतळा ज्या सरदार सरोवरात उभा आहे, त्याचं भूमिपूजन पंडित नेहरूंनी केलं आहे.

-देशाच्या नव्या प्रारंभासाठी मोदी-शाह हे राजकीय पटलावरून बाजूला होणं गरजेचं आहे. देश ह्या दडपशाहीतुन मुक्त होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सैनिकांनो ह्या मोदी, शहांविरुद्ध प्रचार करा. विधानसभेच्या तयारीला लागा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)