नवी दिल्ली – अंतराळात भारताने आज नवा इतिहास निर्माण केला. देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या ‘चांद्रयान 2’ आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला. आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीयांकडून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इस्रो #ISRO ने ‘चांद्रयान 2’ चं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं त्याबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन”.
#ISRO ने चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं त्याबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन. @isro #Chandrayaan2
— Raj Thackeray (@RajThackeray) July 22, 2019
दरम्यान, ‘चांद्रयान 2’ हे 15 जुलैला अवकाशात झेपावणार होते. पण तांत्रिक अडचणीमुळे हे उड्डाण लांबले होते. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मागचा आठवडाभर मेहनत करणाऱ्या शास्त्रज्ञांना के. सिवन यांनी सलाम केला आहे. उड्डाणानंतर 48 दिवसांनी ‘चांद्रयान 2’ मधील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.