हाक एका “मैतराची’… अर्थात पावसाची!!!

मनुष्याच्या जीवनात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्या आगमनाची उत्सुकता जशी ताणून धरली जाते तशीच तो किती काळ धरतीवर कोसळणार आहे याची चिंताही लागून राहत असते. तसाच तो प्रदीर्घ विरहदेखील सहन करायला लावतो. संपता संपत नसलेल्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तो आला की, त्याच बेभान होणे… मध्येच आलेले रुसवे-फुगवे…लहरीपणा असे मानवी नात्याचे सारे कंगोरेच पावसाच्या धारांमधून व्यक्त होत असतात. या साऱ्यात एक धागा असतो तो भटकंतीचा!

पावसाळी भटकंतीचा सध्या ट्रेंड बऱ्यापैकी रुळत चालला आहे. या दिवसात बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढत चाललेली आहे. हे सारं जरी खरं असलं तरी बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येकानेच “पाऊस’ समजून घ्यायला हवा. पाऊस समजला तरच तुमच्या फिरण्याला अर्थ आहे. अन्यथा तुमच्यासारखा अरसिक कोणी नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसावर प्रेम करणारा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे “पाऊसवेड्या’ भटक्‍यांचा! भटकंतीवर निस्सीम, निरपेक्ष प्रेम करणारा हा घटक पावसाची चातकासारखीच वाट पाहत उभा असतो. पाऊस आला की डोंगर-दऱ्या, टेकड्या, शेत-शिवार, नद्या, धरणे, ओढे, झाडे, वेली, पायवाटा हे सारं-सारं तरारुन उठतं. या साऱ्या घटकात सामावलेला पाऊस चिंब होऊन पाहणे, हेच मुळी भटक्‍यांचं उद्दिष्ट असते. मागचा पुढचा विचार न करता चिंब झाल्याशिवाय तुम्हाला पावसाच संगीत आणि स्पर्शही कळणार नाही. पावसाची उत्कटता समजून घ्यायला त्यात मिसळावं लागत. त्याच्याशी बोलावं लागत. डोळ्यांची पारणे फेडण्यासाठी कितीतरी क्षण तुमची वाट पाहत आहेत. हिरव्यागार डोंगराच्या कानात कुजबुजणारे ढगाचे पुंजके, मातीचा लालसर रंग घेवून वाहणारे ओढे-नद्या, जीवाच्या आकांताने डोंगर कड्यावरून कोसळणारे पाण्याचे प्रपात, शेतात तुंबलेले पावसाचे पाणी, सपाट-डोंगरउतारांवर मातीत फुललेले गवताचं हिरव साम्राज्य, धुक्‍यांच्या दुलईत हरवलेला घाटरस्ता, भिजलेली पायवाट, पानावरून ओंघळणारा थेंब, या साऱ्यात तुम्हाला पाऊस बघता आला पाहिजे. नजरेच्या खेळात आपणही तल्लीन व्हायचं असतं. दयाघना, वरुणराजा, घननिळा अशा विशेषणांनी सजलेला पाऊस पाहणे आणि अनुभवणे हे सर्वानांच जमते असे नाही. त्यासाठी मनात निसर्गाबद्दल प्रेम आणि भटकण्याची ओढ असावी लागते. पावसाचा रिमझिम शिडकावा, तांडव, धो-धो कोसळणे हे राग ऐकणं ही देखील एक कला आहे. पाऊस कळायला मनही कलासक्त हवं. हा उत्सव पावसाचं मनापासून स्वागत करणाऱ्यांचा आहे. म्हणूनच पाऊस म्हणजे फक्त कांदाभजी आणि चहा नाही. पाऊस म्हणजे हुल्लडबाजी तर मुळीच नाही. अश्‍यांनी तर पावसाच्या वाटेलाही जाऊ नये. आपल्या चुकीच्या कृतीतून पावसाला बदनामही करू नये.

हा उत्सव आहे निसर्ग आणि पावसाच्या पवित्र नात्याचा! हा उत्सव आहे निसर्गावर प्रेम करणारे भटके आणि सह्याद्रीचा! या जगात प्रत्येकजण कोणाला तरी पुजत असतो प्रत्येकाच्याच नजरेत एक दैवत असते. असंच ते सर्व सजीवांचा नजरेत आहे. ते आहे पावसाचं! खरं आहे…. या साऱ्या जीवनमात्रासाठी पाऊस हा देवच आहे. असं म्हणतात अनुभूतीशिवाय देवपण शक्‍यच नाही. येथेही ही अनुभूती आहेच की; कोरडी, रुक्ष, भकास वाटणारी सृष्टी बदलवून हिरवीगार करणारा हा पाऊस काही चमत्कारापेक्षा कमी नाही. असे चमत्कार-साक्षात्कार आमच्या सारख्या भटक्‍याला या पावसात पावलोपावली पहायला मिळतात.

मी नेहमी विचार करत असतो की, या पावसाचे माझ्यासारख्या भटक्‍याशी नाते कोणत्या स्वरुपात असेल….? पण आतापर्यंत पावसाळ्यात केलेली सारी भटकंती आठवली की, मग हे नातं ठळकपणे समोर येतं. ते असतं सरण, सवंगडी अर्थात मैतराच्या रुपात! पावसाळा अनुभवणारे सारेचं “पाऊसयात्री’ याची खात्री नक्की देतील आणि जास्तपणे उलगडून सांगतील. कारण पाऊस असतोच एखाद्या अल्लड मैतरासारखाच! म्हणजे तो असतो लहरी. येण्याची आणि जाण्याची काळवेळ नसणारा. कधी तो धो-धो बरसून बेधुंदही होतो. कधी तो गायब होऊन रुसतोही. कधी तो वाट पाहून दमवणारा वाटतो. उन पावसाच्या खेळात तो रंगून गेल्यासारखाही वाटतो. पावसाची ही सारी वैशिष्ट्ये एखाद्या मित्रांमध्येच सापडू शकतात. भटकणाऱ्यांच्या बाबतीत हा आणखीनच जीवलग होवून जातो. भटकंतीचे सारे पदर हात धरून उलगडून दाखवणारा हा पाऊस मैत्रीपणाची भावना अधिक तीव्र करीत असतो. पाऊस सुरु झाला आहे, धरतीचे रूपही पालटले आहे. या पावसात “सह्याद्रीही’ ओलाचिंब होऊन तुमची वाट पाहत उभा आहे. येथल्या भिजलेल्या वाटा तुमच्या पावसासाठी आतुर झाल्या आहेत. गार वारा घराबाहेर ओढतोय… मैतराच्या या हाकेला “ओ’ देण्यासाठी थोडी औपचारीकता बाजूला ठेवा….

– ओंकार वर्तले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)