पावसाळा आणि कीटकजन्य आजार (भाग- ४)

डॉ. मानसी पाटील

काळा आजार हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या, प्रोटोझूनच्या) संसर्गामुळे निर्माण होणारा रोग असून त्यात प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) अनियमित ज्वर व अतीव अशक्तता असते. या रोगाला डमडम ताप, बरद्वान ताप अशी दुसरी नावे असून भारताच्या पूर्व भागात त्याचा फार प्रसार आहे. भूमध्यसमुद्राचा किनारा, सूदान, पश्‍चिम व पूर्व आफ्रिका, दक्षिण शिया, उत्तर चीन आणि ब्राझील येथेही हा रोग आढळतो. काळा आजार हे नाव मूळ भारतीय असून या नावावरून रोगाचे मारकत्व दिसून येते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेंग्यू ताप

डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू ताप हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.

डेंग्यू ताप किंवा डीएचएफ असण्याचा संशय असलेल्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्‍टरांना भेटावे. एकदम जोराचा ताप चढणे, डोक्‍याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते, स्नायू आणि सांध्यांमधे वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या.

डेंग्यू रक्‍तस्त्रावात्मक ताप आणि शॉक सिंड्रोमची चिन्हे आणि लक्षणे

तीव्र, सतत पोटदुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होण, झोप येणे आणि अस्वस्थता, रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवतपणे जलद चालते, श्‍वास घेण्याला त्रास होणे.

संपर्क होण्याचा कालावधी

डेंग्यूची लागण झालेली व्यक्ती ही रोग होण्याच्या 6 ते 12 तास आधी डासांसाठी संक्रामक बनते आणि ही अवस्था 3 ते 5 दिवसांपर्यंत राहते.
प्रभाव पडणारे वय आणि लिंग गट सर्व वयोगट आणि दोन्ही लिंगांच्या व्यक्‍तींवर याचा प्रभाव पडतो. डीएचएफच्या उद्रेकादरम्यान मुलांमधे मृत्युचे प्रमाण अधिक असते.

डेंग्यू / डेंग्यू रक्‍तस्त्रावात्मक तापाचा कीटक

एडीस इजिप्ती हा डेंग्यू / डेंग्यू रक्‍तस्त्रावात्मक तापाचा कीटक आहे. हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.

चावण्याच्या सवयी

दिवसा चावतो, घराच्या जवळ मनुष्यांवरच प्रामुख्याने जगतो, वारंवार चावतो

राहण्याच्या सवयी

घरांच्या अंधाऱ्या कोपऱ्यांमधे, कपडे, छत्री टांगलेल्या वस्त, लाकडी सामानाखाली बसतो.

पुनरुत्पादनाच्या सवयी

एडीस इजिप्ती हा डास कोणत्याही भांड्यांमधे अथवा टाकीमध्ये शिल्लक असलेल्या अगदी थोड्या पाण्यातही वाढतो. एडीस इजिप्तीची अंडी पाण्याविना एक वर्षाहून अधिक काळ राहू शकतात.

पुनरुत्पादनाच्या आवडत्या जागा

डेझर्ट कूलर्स, ड्रम, बरण्या, भांडी, बादल्या, फुलपात्रे, कुंडीखालील बशी, टाकी, बाटल्या, डबे, टायर्स, वळचण, फ्रीजचं पाणी साठण्याचं पात्र, सिमेंटचे ब्लॉक्‍स, मडकी, नारळाच्या करवंट्या, झाडातील ढोल्या आणि ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठते किंवा साठवले जाते अशा अनेक जागा.

डेंग्यू / डेंग्यू रक्‍तस्त्रावात्मक ताप

उपचारांपेक्षा खबरदारी केव्हाही चांगली. डेंग्यू डीएचएफच्या उपचारांसाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. एडीस इजिप्ती डासावर नियंत्रण मिळवणे हाच एकमेव उपाय आहे. लवकर निदान होणे आणि रुग्णाची योग्य व्यवस्था पाहणे आणि लक्षणांनुसार उपचार करण्याने, मृत्युचा दर बराच कमी करता येतो.

डासाच्या नियंत्रणाचे उपाय

1.व्यक्‍तिगत प्रतिबंधक उपचार
डास निवारक क्रीम्स, लिक्वीड, कॉईल्स, मॅट्‌स इत्यादी. संपूर्ण बाही असलेले शर्ट आणि सॉक्‍ससहित संपूर्ण पॅंट घालणे. लहान बालकं आणि तरुण मुलांसाठी दिवसा मच्छरदाणीचा वापर करणे म्हणजे त्यांना डास चावणार नाहीत

2. जैवशास्त्रीय नियंत्रण
शोभेच्या टाक्‍यांमधे, कारंजा इत्यादींमधे डासांच्या अळ्या खाणारे मासे पाळणे
जैविक कीटनाशकांचा वापर करणे

3. रासायनिक नियंत्रण
मोठ्या टाक्‍यांमधे पुनरुत्पादन आढळल्यास तेथे अबेटसारख्या रासायनिक अळीनाशकांचा वापर करणे. दिवसा एरोसोल स्प्रेचा वापर करणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)